दहीहंडीच्या धामधुमीत दरवर्षी खच्चून भरणारे ठाणे शहरातील रस्ते गुरुवारी वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोकळा श्वास घेताना दिसले. शहरातील रस्ते अडवून जागोजागी साजरा होणाऱ्या या उत्सवाचे सर्वत्र मोठे आकर्षण असले तरी यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य ठाणेकर हैराण होतात. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही गोिवदा पथकांच्या मोठय़ा वाहनांना मूळ शहरात प्रवेशबंदी केली. ही वाहने द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सव्र्हिस रस्त्यांवर उभी करावीत, असा फतवा पोलिसांनी काढला. यामुळे सव्र्हिस रोडवरील वाहतूक जवळपास बंद झाली, तर महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरातील रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत असली तरी गोखले मार्गासारख्या शहरातील मुख्य चौकात दहीहंडीच्या आयोजनामुळे या ठिकाणी मात्र वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र होते…
उत्सवाच्या निमित्ताने सर्व नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यात वाहतुकीची अडवणूक करण्याचा शिरस्ता ठाणेकरांना तसा नवा नाही. पाचपाखाडी भागात मोक्याचा चौक अडवून साजरी केली जाणारी ‘संघर्ष’ची हंडी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या ठाणेकरांसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरली आहे. गोखले मार्गावर हिंदूू जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करणारी वाहतूक अडवून धरते, असा दरवर्षीचा अनुभव आहे. शिवसेनेतर्फे जांभळी नाका, टेंभी नाका येथे उभारण्यात येणाऱ्या मानाच्या हंडीमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडतो. लाखमोलाच्या या हंडय़ा फोडण्यासाठी मुंबईतील मोठी गोंविदा पथके सकाळपासूनच ठाण्याचा रस्ता धरतात. मोठय़ा वाहनांमधून गोिवदांचे जथ्थेच्या जथ्थे दिवसभर ठाण्यात येत असतात. ही वाहने शहरात शिरत असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र वर्षांनुवर्षे पाहावयास मिळत असते. त्यामुळे ठाण्याचा हा उत्सव संपूर्ण राज्यभरात नावाजला जात असला तरी ठाणेकरांना तो वाहतूक कोंडीमुळे नकोसा होतो, असे चित्र अनेकदा निर्माण होते. चौक, रस्ते अडवून उभारल्या जाणाऱ्या दहीहंडय़ा आणि गोविंदांच्या मोठय़ा वाहनांच्या गजबजाटामुळे पूर्वी ठाण्यात चक्काजाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होत असे. यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षांपासून वाहतूक पोलिसांनी गोविंदा पथकांच्या मोठय़ा वाहनांना मूळ शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही हा निर्णय कायम ठेवण्यात आल्याने गोखले मार्ग, तीन पेट्रोल पंप, खोपट, वंदना, महापालिका परिसरातील वाहतूक सुरळीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मूळ शहरापलीकडे असलेल्या वागळे, वर्तकनगर परिसरातील मुख्य रस्तेही मोकळा श्वास घेताना दिसत होते… मोठी वाहने शहरात शिरू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी तीनहात नाका, नितीन कंपनी, खोपट येथे कडक बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, ही सर्व वाहने पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सव्र्हिस रोडवर उभी करण्याच्या निर्णयामुळे महामार्गावर जागोजागी वाहतूकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र होते. सव्र्हिस मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी होती, तर महामार्गावर दोन्ही बाजूस गोंविदा पथकाच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हेच चित्र घोडबंदर परिसरातही दिसून येत होते.
यंदाच्या वर्षी बहुतांश गोविंदा मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गोविंदांची वाहतूक करण्यासाठी ट्रकऐवजी बसचा पर्याय निवडल्याचे चित्र दिसत होते. अतिउत्साही गोंविदा पथके उघडय़ा ट्रकमध्ये लोंबकळतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. हे लक्षात घेऊन बसेस भाडय़ाने घेऊन त्यामधून मंडळाच्या कार्यकर्त्यांची वाहतूक करण्याचा पर्याय निवडण्यात आला.
गोविंदांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी
दहीहंडीच्या धामधुमीत दरवर्षी खच्चून भरणारे ठाणे शहरातील रस्ते गुरुवारी वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोकळा श्वास घेताना दिसले.
First published on: 30-08-2013 at 09:49 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd of govindas and transportation deadlock