पर्वती दर्शन भागातील एका नागरिकाने पुण्यातल्या सगळ्या वृत्तपत्रांकडे एक पत्र पाठवले आहे. त्याची तक्रार अशी की, या भागात डेंग्यूने एका तरुणाचा मृत्यू झाला, याचे कारण वाहून जाणाऱ्या कचऱ्या पेटय़ा हे आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची परिस्थिती भयावह स्वरूपाची आहे. ड्रेनेज तुंबलेले असते आणि अनेक लोकांची घरे ड्रेनेजच्या पाईपवर आहेत. त्यांच्या घरातच हे पाणी घुसते. ठिकठिकाणी सांडपाणी साठलेले आहे. बेवारस कुत्री मोकाट फिरत असतात. बहुतेक वृत्तपत्रांनी या पत्राकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, कारण त्यांच्यासाठी या तक्रारीमध्ये नवे असे काहीच नाही. सारे शहर ही एक भली मोठी कचराकुंडी झाली असून, त्याकडे कुणाचेच लक्ष नाही, असा कंठशोष सारी माध्यमे करत असतात. त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस अधिकाधिक हिणकस होऊ लागले आहे. तक्रारीचा पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. त्यात म्हटले आहे की, नगरसेवकाकडे तक्रार घेऊन गेले की त्याचे भलतेच म्हणणे असते. ते म्हणतात, तुम्ही मला मतदान केले नाही, मग मी तुमची कामे कशाला करू? जे नगरसेवक निवडून येतात, ते बहुमताने निवडून येतात. निवडून आल्यानंतर ते संपूर्ण वॉर्डाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यांना ज्यांनी मते दिली, त्यांचेच ते प्रतिनिधी असत नाहीत. परंतु राजकारण करायचे म्हणजे विरोधकांना चेपायचे, एवढेच माहीत असलेल्या नगरसेवकांना अद्याप हे कुणीच सांगितलेले दिसत नाही की, मते न देणाऱ्यांची कामे केली नाहीत, तर ते मतदार कधीच मत देणार नाहीत, पण ज्यांनी मते दिली, तेही तुमच्याच नावाने ठणाणा करतील. अशाने आयुष्यात फक्त एकदाच नगरसेवक होण्याची संधी मिळवण्याने धड स्वत:चे भले होत नाही, की शहराचे. कोणी कोणाला मतदान केले, हे छातीठोकपणे सांगणारे नगरसेवक आपला विरोधक चांगलेच ओळखून असतात. संत तुकाराम महाराजांनी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले असले तरी नाठाळांच्या माथी ते शिरायला हवे ना! मतदान संपल्यानंतर वैर संपते आणि विरोधकही संपतात. काम चांगले करून विरोधकांनाही आपल्या खिशात घालायचे सोडून त्यांना छळणे याला सभ्य मराठी भाषेत मुजोरी असे म्हणतात. अशी मुजोरी शहराच्या अनेक वॉर्डामध्ये सुखेनैव सुरू आहे. नगरसेवकांना राजकीय आणि सामाजिक शहाणपण शिकवण्याचे कार्यक्रम सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू करायला हवेत. आपण आणि आपला वॉर्ड ही कल्पना बाजूला ठेवून आपले वैयक्तिक हेवेदावे मागे ठेवून शहराचे हित म्हणजे काय, हे त्यांना समजून सांगायला हवे. राजकीय नेत्यांना त्यांच्या पुढेपुढे करणारे नगरसेवक हवे असतात. पण त्यामुळे शहराचे जे काही भयावह हाल होतात, त्याच्याशी कुणालाच काही देणेघेणे नसते. मुजोरांपुढे नाक धरून उभे राहणाऱ्या नागरिकांनाही हे कधी लक्षात येत नाही की, आपल्या मताने एखादा उमेदवार पडतो किंवा जिंकतो, तेव्हा त्याच्यावर आपले दडपण असणे आवश्यक आहे. हे न कळल्याने निवडून आल्यानंतर असा ओरडा सुरू होतो. सगळ्या वॉर्डामध्ये सध्या जो ऊतमात सुरू आहे, त्याविरुद्ध ब्र काढण्याची कुणाची हिंमत नाही. धाकदपटशा आणि धमक्या यामुळे सामान्यजन आता त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाला असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही, कारण अधिकारी आणि कर्मचारी नगरसेवकांच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. अशा स्थितीत पुण्याचे भले कसे बरे व्हावे? मुजोरांच्या तोंडाला हात लावायचा की घरात शांत बसायचे, अशा संभ्रमात सध्या सारे पुणेकर आहेत.
   – मुकुंद संगोराम
mukund.sangoram@expressindia.com