शहरातील बेशिस्त वाहतुकीने जामखेड-सोलापूर रस्त्यावर आज आणखी एका युवकाचा बळी घेतला. सीएसआरडी महाविद्यालयातील या युवकाचे नाव क्लिस्टिन पॉल जेकब असून त्याच्या सहकारी मित्रांनी व महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही नंतर तासभर रास्ता रोको आंदोलन करून पोलीस व वाहतूक शाखेचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला.
सीएसआरडी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी सकाळीच नगर महाविद्यालयाच्या मैदानावर जमले होते. सकाळच्या सत्रातील स्पर्धा झाल्यानंतर जेवणासाठी क्लिस्टिन भिंगारला घरी गेला. परत येताना सोलापूर रस्त्यावरील जामखेड फाटय़ाजवळ एका भरधाव वेगात जाणाऱ्या मालमोटारीने त्याच्या अ‍ॅक्टिवा गाडीला (क्रमांक एम.एच.३१ एसडब्लू २४६२) धडक दिली. त्यामुळे क्लिस्टिन गाडीवरून जोरात बाजूला फेकला गेला. धडक देणारी मालमोटार निघून गेली.
अपघातानंतर काही वेळ रस्त्यावर कोणीच नव्हते, त्यामुळे क्लिस्टिन जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. नंतर कोणीतरी आले, त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांना अपघाताची माहिती दिली. क्लिस्टिनला लगेचच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या मुलांनी लगेचच जामखेड रस्त्यावर येऊन थेट रास्ता रोको आंदोलन सुरू केले. गणेश ताठे, चंद्रभागा वाघमारे, उशरार शेख, वसीम शेख, वैशाली दांडोरे या विद्यार्थ्यांबरोबरच प्रा. सर्वश्री जगदीश जाधव, सुरेश मुकुटमल, डॉ. जयमल वर्गीस, प्रदीप झारे, विजय संसारे व सुमारे २०० विद्यार्थीविद्यार्थीनी या आंदोलनात उस्फुर्तपणे सहभागी झाले.
वाहतूक शाखेच्या व पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत मुलांनी सगळा रस्ता अडवला. क्लिस्टिन चा बळी बेशिस्त वाहतुकीमुळेच गेल्याची मुलांची भावना होती. रस्त्यावरची वाहतूक थांबल्यानंतर पोलिसांना जाग आली. भिंगार पोलीस ठाण्याचे श्री. बकाले तसेच कोतवालीचे अभिमन पवार, विजयसिंह पवार तसेच अन्य अधिकारी तिथे आले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून आणावे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र नंतर प्राध्यापक तसेच पोलिसांनी त्यांची समजूत घातली व आंदोलन थांबले. वाहतुकीची कोंडी वाढत चालल्यामुळे पोलीस त्रस्त झाले होते, त्यातच काही पोलिसांनी विद्यार्थ्यांशी अरेरावी केली, त्यामुळे थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वाहतुकीला व वाहतूक शाखेच्या पोलीसांनाही शिस्त लावावी असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

Story img Loader