विचारवंत म्हटल्या जाणाऱ्या वक्त्याच्या भाषणातून नवा विचार ऐकायला मिळण्याची अपेक्षा श्रोत्यांची असते, पण विचारदर्शनाऐवजी जर पांडित्यप्रदर्शन झाले तर श्रोत्यांचा होणारा भ्रमनिरास अमर्याद असतो. ऐकायला गेलो काय अन् कानी पडले काय, असेच काहीसे विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींच्या व्याख्यानाबाबत वध्र्यात घडले.
प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेचे वध्र्यात दरवर्षी होणारे आयोजन श्रोत्यांसाठी एक प्रबोधनपर अनुभव ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा अशांच्या व्याख्यानांची मेजवानी अनुभवणाऱ्या वर्धेकरांना डॉ. सप्तर्षींचे व्याख्यान म्हणजे एका राजकीय नेत्याचे वरकरणी विचार व्यक्त करणारे बोल वाटले. रंजनाऐवजी प्रबोधन हा आयोजनाचा मुख्य हेतू असतो. कायदेशास्त्राचा गाढा अभ्यासक राहिलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ होणारा हा कार्यक्रम कायदा व न्यायालय याविषयी सहजसोप्या शब्दात सामान्यांचे प्रबोधन व्हावे व त्याची, कोर्टाची पायरी चढू नये, ही भीती दूर करावी, असा मानस ठेवून होतो. तसे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले. यावेळी व्याख्यानाचा विषय ‘भारतीय संविधान व जनआंदोलन’ हा होता, पण सप्तर्षी संविधानावर चार शब्दही बोलले नाहीत आणि जनआंदोलनावरील भाष्य चार वाक्यात आटोपले. मनुस्मृती, स्त्रीदास्य, जातीव्यवस्था, धर्मसंदेश यातच त्यांनी शब्दपसारा मांडला. कायदेक्षेत्रातील मंडळी, बुध्दीजीवी, सामाजिक कार्यकर्ते अशा म्हणजे बुध्दीजिवी श्रोत्यांना सप्तर्षींचे भाषण देशाच्या संस्कृतीवरील टीकात्मक भाष्यापलिकडे महत्वाचे वाटले नाही.
विषयाला बरेच मागे टाकून डॉ. सप्तर्षी बोलत असतांना त्यांचे व्यक्तिगत मोठेपण व पांडित्य दर्शन मात्र व्यक्त करायला चुकत नव्हते. अण्णा हजारे व शरद जोशी यांनी महाराष्ट्राचे खूप नुकसान केले, बबन (पाचपुते) आता कीर्तनकार झाला, डॉ. अमर्त्य सेन मला म्हणाले, माझी सर्व आंदोलने यशस्वी झालीत. इतरांची फ सली, चळवळ एकवर्गीय नको, अशी वक्तव्यं त्यांनी केली. शरद जोशींची चळवळ एकवर्गीय होती. त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले. केवळ राज्यसभेचे खासदार होणे हेच त्यांचे उद्दिष्टय़ होते, तर त्यांना दत्ता मेघेही खासदार करू शकले असते, असे मेघेंच्याच उपस्थितीत बोलत डॉ. सप्तर्षींनी शरद जोशींचे वाभाडे काढले. ७० टक्के शेतकऱ्यांच्या देशात केवळ शेतकऱ्यांचा लढा उभारणे योग्यच आहे, अशी त्यावर प्रतिक्रिया एका शेतकरी नेत्याने दिली. माझी २६ एकराची शेती नफ्यात आहे, असे म्हणणारे सप्तर्षी इतर तोटय़ातील शेतीचे खापर शेतकऱ्यांवर फ ोडतात. कॉंग्रेसच्या शेतीविषयक धोरणाचं एकप्रकारे समर्थनच करतात. या विसंगतीला काय म्हणावे, असेही हा शेतकरी नेता म्हणाला.
माझी आंदोलनं यशस्वी व इतरांची नाही, हे सांगणाऱ्या सप्तर्षीनी स्वत:च्या नेतृत्वाखाली शेकडोंचा लढा उभारून यशस्वी केलेल्या त्यांच्या आंदोलनाचा एकही दाखला मात्र दिला नाही. अण्णांशी फोटले म्हणून अण्णा किती चुकीचे, हे त्यांच्याकडून पदोपदी ऐकावे लागले, असेही यावेळी उपस्थित एका अण्णा समर्थकाने स्पष्ट केले. डॉ. सप्तर्षींकडून आंदोलनाबाबत केवळ काही गांधी विचार ऐकायला मिळाले. वर्तमान गरजेवर भाष्य नव्हते. आंदोलनाची पथ्यं काय, नैतिकता, चारित्र्य, सत्याग्रहाची भूमिका, याविषयी त्यांनी काही चांगली मतंही व्यक्त केली. जनआंदोलन हा छंद मानू नये. युध्द नको म्हणायला जे युध्द करावं लागतं, तो सत्याग्रह होय. जनआंदोलनाचं उद्दिष्टय़ राजकीय पक्षासारखंच असतं. यापुढे वाईटापेक्षा कमी वाईट बरे, असेच लोकं निवडून द्यावे लागतील. शिक्षण, राजकारण व जनआंदोलन याद्वारेच राष्ट्रबांधणी शक्य होईल. तीन पौंडापेक्षा कमी वजनाची ३० कोटी मुले ही सामाजिक व राष्ट्रीय अधोगतीच होय, हे त्यांनी मांडलेले विचार श्रोत्यांसाठी नवे होते.
भली माणसं बावळट असतात, पण बावळटपणाने देशाचं नुकसान होतं. देशात ९० टक्के कच्ची, ५ टक्के लुच्ची व ५ टक्के सच्ची जनता आहे. लुच्ची व सच्ची यापैकी ज्याचा प्रभाव अधिक त्यामागे ९० टक्के कच्ची जनता जाते, हे निवडणूक पध्दतीवरील त्यांचे भाष्य मार्मिक ठरले, पण एकूणच भाषणास गांभिर्याचा बाज नव्हता. त्यामुळे मोजकेच मांडलेले काही नवे विचार गांभिर्य हरवून बसले, अशी प्रतिक्रिया एका महाविद्यालयीन प्राचार्याने दिली. माझा तो सत्याग्रह व इतरांचा तो दुराग्रह, अशा मी पणात झाकोळलेल्या सप्तर्षींच्या व्याख्यानाने काही घटका रंजन झाले. ते स्मृतीत राहिले नाही. बौध्दिक खाद्य मिळण्याची अपेक्षा ठेवून बसलेल्यांना चटपट पुणेरी भेळीवरच समाधान मानावे लागले, असाच उपस्थितांचा सूर उमटला. व्याख्यानाचा विषय असलेल्या, भारतीय संविधान व जनआंदोलन, या सूत्राचा डॉ. कुमार सप्तर्षींनी आपल्या व्याख्यानातून एकदाही उच्चार केला नाही, यातच सगळं काय ते आलं. गाजावाजा झालेला चित्रपट पाहायला जावं आणि निराशाजनक अनुभव यावा, तसंच नाव असलेल्या या मान्यवर वक्त्याबाबत झाल्याची प्रतिक्रिया उमटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा