दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांतर्गत येणाऱ्या पाच राज्यांतील सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी एकटे शासन व प्रशासन काही करू शकत नाही. काम बरेच असल्यामुळे काही सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्यांचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करू, शासनाकडून निधी कमी मिळत असला तरी त्यात चांगले करण्याचा आणि केंद्राच्या उत्पन्नवाढीसाठी नवीन आखणी करण्याकडे लक्ष देणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉ. पीयूष कुमार यांनी केंद्राच्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यमान संचालक डॉ. रवींद्र सिंगल यांनी केंद्रात चांगले काम केल्यानंतर केंद्राकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कलावंतांसाठी विमा योजना सुरू करण्याचा विचार असून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. राहिलेल्या कामांना पुढे नेणार असून सांस्कृतिक प्रगती करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण क्रीडा प्रकार, खान पान व इतर गोष्टींना केंद्राच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचा प्रयत्न राहील, कलाकारांना सामाजिक संरक्षण नाही त्यामुळे त्यांना संरक्षण मिळवून देण्यासह काम मिळवून देऊ. कलावंत कल्याण योजना सुरू करण्यात येणार आहे. शिवाय कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे डॉ. कुमार म्हणाले.
संस्कृती आणि कलाकारासंदर्भात प्रत्येकाने मानसिकता बदलण्याची गरज असून वेळेसोबतच प्रत्येकाला आता चालावे लागणार आहे. तंत्रज्ञानाशी जुळवून घेत ‘ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरी’ तयार करण्यात येईल. त्यामुळे सर्व ऑनलाईन होईल. एखाद्या कलाकारांचा दूरध्वनी क्रमांक ऑनलाईन मिळू शकेल. कालिदास महोत्सव सध्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे असून केंद्रातर्फे तो सुरू करण्यासाठी पर्यटन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. नागपुरात संगीताचे कार्यक्रम, सकाळच्या मैफिली सुरू करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही कुमार यांनी सांगितले.

Story img Loader