सोशल मीडिया, टिव्ही यांच्या मायाजाळात फसलेल्या विद्यार्थ्यांना विटी-दांडू, लगोरी, भोवरा, गोटय़ा, आटय़ापाटय़ा, मामाचे पत्र, चोरचिठ्ठी, काचा जमा, काठय़ा, कवडय़ा, विष-अमृत, डब्बा एक्स्प्रेस यांसारखे खेळ असण्याचे काही कारण नाही. त्यामुळे कालबाह्य़ होत चाललेल्या या खेळांचे नवीन पिढीला आकलन, अवलोकन आणि आर्कषण व्हावे यासाठी ऐरोली येथील स्वराज्य मित्र मंडळ व जनसेवा प्रतिष्ठान या दोन संस्थांनी ख्रिसमस दिनाचे औचित्य साधून गुरुवारी एक कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यामुळे जुने तेच सोने याची प्रचीती या मुलांना येणार आहे. यात दोनशे विद्यार्थी ऐरोली सेक्टर दहा येथील मैदानात सकाळी आठ वाजल्यापासून भाग घेणार आहेत. हे खेळ खेळलेले पालक या विद्यार्थ्यांना हे खेळ शिकवणार आहेत.
सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने एका १९ वर्षीय तरुणाचा यात्रेत खरेदी केलेल्या चाकूने खून केला. खुनाचे कारण अत्यंत क्षुल्लक होते. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मोबाइलमधील एक खेळ विशाल मारुती भिसे या १९ वर्षीय तरुणाने नष्ट केला होता. त्याचा इतका राग त्या अल्पवयीन विद्यार्थाला आला की त्यांने विशालच्या पोटात चक्क चाकू घुसवला. त्यात विशाल मृत्यू पावला. त्यामुळे मोबाइल हातात असलेल्या मुलांकडून पालकांनी मोबाइल हातातून काढून घेणे किंवा तो बंद करणे मोठा अपराध असल्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे लागलीच चिडचिड, संताप होणाऱ्या या पिढीला २५-३० वर्षांपूर्वीच्या काही छान खेळांची माहिती व्हावी म्हणून मोहन हिंदळेकर, पंकज भोसले या तरुणांनी एक प्रयोग करण्याचे ठरविले असून उद्या या प्रयोगाचा पहिला खेळ होणार आहे. या विद्यार्थ्यांना सहज व मोफत खेळता यावेत अशा विटी-दांडू, लपाछपी, भोवरा अशा १५ खेळांचे या दोन संस्था प्रशिक्षण देणार आहेत. त्यासाठी त्यांचे समुपदेशनदेखील केले जाणार आहे. या खेळामुळे आनंद तर मिळणार आहेच पण व्यायामदेखील होणार असल्याचे हिंदळेकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा