उदगीर शहरात शनिवारी दोन गटांतील वैमनस्यामुळे अचानक दंगल सुरू झाली. जाळपोळ, हाणामाऱ्या या प्रकारामुळे वातावरण  चिघळले. दुपारनंतर जिल्हा पोलीसप्रमुखांनी उदगीर शहरात संचारबंदी लागू केली आहे.
शुक्रवारी उदयगिरी किल्ल्यामधील उदालिक महाराजांच्या समाधीवरील झेंडा बदलण्यात आल्याचे निमित्त झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून शुक्रवारीच झेंडा पूर्ववत लावला होता. मात्र माथेफिरूस त्वरित अटक करावी, ही मागणी करत जमावाने पोलिसांवर दबाव आणला होता. पोलिसांनी माथेफिरूस अटक करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शुक्रवारी कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. मात्र, शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यासमोर माथेफिरूस अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन पुकारण्याच्या इराद्याने जमाव जमला होता. तो पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यातूनच शहर बंदची हाक देण्यात आली. तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे शहरभर बंदची हाक देत फिरत होते. यात जाळपोळीचे प्रकारही घडले.
तीन ज्युस सेंटर तरुणांनी जाळण्याचा प्रयत्न केला. पाच मोटरसायकलला आग लावण्यात आली. दोन एस.टी. बसेस व पाच ट्रकच्या काचाही फोडण्यात आल्या. शहरात काही ठिकाणी समोरासमोर झालेल्या चकमकीत एकूण नऊजण गंभीर जखमी झाले. जमाव उग्र झाल्यामुळे पोलिसांनी शहरात ९ ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. दहावी व बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी दुपापर्यंत १४४ कलम लागू केले होते. दुपारी ३ नंतर शहरात सार्वत्रिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी बी. एल. गिरी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण उदगीरमध्ये परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाण मांडून आहेत. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर हे स्वत: रस्त्यावर उतरले. दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे  गायकर यांनी सांगितले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उदगीरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. सकाळपासून आसपासच्या गावात अफवांचे पीक पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा