माध्यमिक शाळांतील अनुशेष भरती व बढतीतील गैरव्यवहार तसेच प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा मागासवर्गीय ओबीसी, अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुण्यात मंगळवारी (दि. १२) शिक्षण संचालनालयासमोर घंटानाद आंदोलन करणार आहे. संघटनेचे संघटनप्रमुख रवींद्र पटेकर, जिल्हाध्यक्ष विलास साठे व सचिव सोन्याबापू कुळसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नगरसह नाशिक व पुणे जिल्हय़ातील अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष डावलून भरतीस मान्यता दिली, बढतीही मान्य केली, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दलालांच्या मध्यस्थीने या मान्यता सन २०११-१२ पासून दिल्या, संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करून अनुशेष भरती न करणाऱ्या संस्थांवर कारवाईची मागणी केली, मात्र गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, असा आरोप संघटनेच्या पत्रकात करण्यात आला आहे. अनुशेषाच्या विरोधात दिलेल्या मान्यतांची चौकशी करावी, अशी संघटनेची मागणी आहे.
याशिवाय या तीन जिल्हय़ांतील माध्यमिक शिक्षण विभागाकडे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नियमाप्रमाणे १० टक्के मान्यता तपासणीची कार्यवाही होणे बाकी आहे, असे नमूद करतानाच संघटनेचे पदाधिकारी डॉ. सुधाकर शेलार, प्रा. आर. डी. जाधव, शरद मेढे, गणपत नाथन, गौतम वाघमारे, ज्ञानदेव काळे, डी. पी. गायकवाड आदींनी पुण्यातील आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader