तालुक्यातील तिखी शिवारात वादग्रस्त जमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी प्रशासनाला संचारबंदी जाहीर करावी लागली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आदल्या दिवशी रात्रीच बंदोबस्तासाठी आवश्यक असलेली कुमक सज्ज ठेवली होती. शुक्रवारी सकाळी नगर भूमापन विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांनी बंदोबस्तात जमिनीची मोजणी सुरू केली.
तिखी शिवारातील गट क्रमांक २१२ मधील जमीनसंदर्भात निर्माण झालेले वादग्रस्त प्रकरण न्यायालयात असल्याने या जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी किमान २४ तास संचारबंदी करणे भाग पडले. यापूर्वी नगर भूमापन विभागातर्फे या वादग्रस्त जमिनीची मोजणी करण्याचा ३० जानेवारी आणि २६ जुलै या दिवशी अयशस्वी प्रयत्न झाला होता. या जमिनीची खरेदी-विक्रीही वादग्रस्त ठरल्याने अनिलकुमार जोशी यांनी खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने वादग्रस्त जमिनीच्या मोजणीचे आदेश दिले. आदेश पोलीस प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री बारा ते शुक्रवारी रात्री आठपर्यंत या वादग्रस्त  क्षेत्रात संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सकाळी तिखी शिवारात पोलिसांचा फौजफाटा पोहोचला. साडेदहा वाजता मोजणी सुरू झाली. एखाद्या जमिनीच्या मोजमापासाठी काही काळ संचारबंदी केली जाण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे.
बुडाल्याने दोघांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात बुडाल्याने दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील वरवाडे शिवारातील धरणात बुडाल्याने पित्रेश्वर कॉलनीतील सीताराम दादू वैदू (४०) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली, अशी माहिती तात्या दादू बंदू यांनी पोलिसांना दिली. सीताराम वैदू हे २६ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. दुसरी घटना साक्री तालुक्यातील चौपाळे शिवारात गुरुवारी दुपारी घडली. दयाराम दगडय़ा महाले यांच्या विहिरीत आरती गुलाब महाले (१३) ही पाय घसरून पडली. बुडाल्याने आरती महाले हिचा मृत्यू झाला. पिंपळनेर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
परिवहन अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी
शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर एका मालमोटारीतून आलेल्या तिघांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी नवीसांगवीचे परिवहन अधिकारी अभिजित गायकवाड (३३) यांनी फिर्याद दिली आहे. शिरपूरकडून आलेल्या मालमोटारीची तपासणी करू नये, असे म्हणत पळासनेर येथील राहुल जाधव, धनसिंग ऊर्फ भय्या गोरखसिंग राजपूत (२७) आणि सुरेंद्रसिंग राजपूत (३०) यांनी गायकवाड यांना चाकूचा धाक दाखविला. दोन हजारांची खंडणी मागितली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुईमूग पिकाची चोरी
शिंदखेडा तालुक्यातील चांदगड शिवारात एक एकर शेतातील भुईमुगाचे पीक चोरून नेल्याच्या आरोपाखाली सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. काशिनाथ दला पाटील (रा. वायपूर)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब पाटील, दिगंबर पाटील, वैजयंती पाटील, लीलाबाई पाटील, चित्राबाई पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीस गेलेल्या भुईमुगाची किंमत किमान ५० हजार रुपये असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.