गेल्या लोकसभा निवडणुकीत १ लाख ४३ हजार मते मिळवून शिवसेनेला अडचणीत आणणाऱ्या वेरुळ येथील शांतिगिरीमहाराज यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश रविवारी (दि. २१) औरंगाबादेत येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्या वेरुळला गुरुपौर्णिमा महोत्सव सुरू असून, रविवारी कुटियाधाम भूमिपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम आहे. मोहन प्रकाश व शांतिगिरीमहाराज यांची ही भेट राजकीय स्वरूपाची मानली जाते. या भेटीसाठी आलेल्या मोहन प्रकाश यांच्याकडून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार ठरवला जाऊ शकतो, म्हणून इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शांतिगिरीमहाराज यांना १ लाख ४३ हजार मिळाली होती. ते निवडणुकीत उभे राहिले नसते, तर ही मते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पारडय़ात पडली असती, असा दावा शिवसेनेकडून केला जातो. काँग्रेसची मंडळी ही मते अंतर्गत राजकारणातून शांतिगिरीमहाराजांना मिळाली, असा दावा करतात. तथापि, लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मिळालेली मते लक्षात घेता थेट काँग्रेसच्या प्रभारींची व त्यांची भेट घडवून देण्यात काहीजण उत्सुक आहेत.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उत्तमसिंह पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा खैरे यांनी ३२ हजार ६९१ मतांनी पराभव केला. मोहन प्रकाश व शांतिगिरीमहाराज भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे सरसावले आहेत.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला. १९ ऑगस्टला मतदान, तर २१ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. औरंगाबाद व जालना जिल्हय़ांतील ४७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले सदस्य मतदार असतात. दोन्ही जिल्हय़ांत काँग्रेस-राष्ट्रवादीची २९७ मते, शिवसेना ९०, मनसे १० व अपक्ष ७६ मतदार आहेत. पक्षाच्या व्हीपनुसार आघाडीला मतदान झाले तर काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असे मानले जाते. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत.
काँग्रेसमधून सुभाष झांबड, रवींद्र संचेती, सय्यद अक्रम, मुगदिया यांच्यासह जालन्यातील अब्दुल हाफीज, बाबूराव कुलकर्णी आदी उत्सुक आहेत. मोहन प्रकाश यांच्या औरंगाबाद दौऱ्यात लोकसभेच्या अनुषंगाने चाचपणी सुरू असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारीचीही चर्चा यानिमित्ताने होईल, असे मानले जाते. राष्ट्रवादीलाही उमेदवार ठरवताना विचारात घेतले जाणार असल्याने त्या पक्षातूनही नाव सुचविले जावे, यासाठी काँग्रेसमधील नेतेमंडळींचे प्रयत्न आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहन प्रकाश व शांतिगिरी यांच्यातील बैठक ‘अल्पसंख्याक’ समाजाला खटकेल, अशी चर्चाही काँग्रेसअंतर्गत पेरली जात आहे.
मोहन प्रकाश-शांतिगिरी भेटीची उत्सुकता
गेल्या लोकसभा निवडणुकीत १ लाख ४३ हजार मते मिळवून शिवसेनेला अडचणीत आणणाऱ्या वेरुळ येथील शांतिगिरीमहाराज यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश रविवारी (दि. २१) औरंगाबादेत येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
First published on: 20-07-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity to visit mohan prakash shantigiri