मागील काही दिवसांपासून जवळजवळ सर्वच कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कबाबत समस्या निर्माण होत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. एकीकडे मोबाईल सेवांचे दर वाढत असताना त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.
मोबाईलला कव्हरेज मिळत नसल्याच्या समस्येला प्रामुख्याने ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. मागील दोन आठवडय़ांपासून ही समस्या सुरू झाली असल्याचे विविध कंपन्यांच्या ग्राहकांच्या तक्रारीवरून दिसून येते. सातत्याने ही समस्या जाणवत नसली, तरी ठराविक कालावधीसाठी मोबाईलचे नेटवर्क गायब होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मोबाईलला कव्हरेज नसल्याने अनेक वेळा फोनच लागत नाहीत. त्याचप्रमाणे सुरू असलेला फोन मध्येच बंद होऊन संपर्क तुटण्याचे प्रकारही होत आहेत. याशिवाय फोन सुरू असूनही एकमेकांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही, अशाही अनेक तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे एकमेकांना संपर्क करू इच्छिणाऱ्या दोघांच्याही मोबाईल संचामध्ये नेटवर्क दाखवत असताना प्रत्यक्षात त्यांचा एकमेकांना फोन लागत नसल्याचाही काहींचा अनुभव आहे. मोबाईल संच केवळ फोन करण्यापूरताच मर्यादीत नसून, सध्या मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही झपाटय़ाने वाढली आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेटच्या वापरातून केवळ करमणूकच नव्हे, तर व्यवसाय व कार्यालयीन कामेही केली जातात. नेटवर्कच्या समस्येमुळे काही प्रमाणात या सेवेवरही परिणाम होतो आहे. इंटरनेट सेवेचा वेग कमी झाल्याच्याही तक्रारी करण्यात येत आहेत.  मोबाईल सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांनी त्यांचे दर कमी अधिक प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात फटका बसत असून मोबाईलची सेवा सुधारण्याची अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत असताना सध्या निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader