दिवाळीचा बाजार म्हणजे त्यात ‘आकाशकंदिल’ ला हमखास स्थान. दिवाळीच्या यादीतील आपले स्थान आजतागायत आकाशकंदिलने कायम राखले आहे. दिवाळी उंबरठय़ावर आल्याने तिच्या स्वागतासाठी नाशिकची संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली असली तरी बाजारपेठेत नव्याने दाखल झालेले आकाशकंदिलचे विविध प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चायनीज् कंदिलांचीही त्यात भरमार असली तरी ग्राहकांनी ‘इको फ्रेंडली’ आकाशकंदिलांना आपली पसंती दर्शविली आहे.
दीपोत्सव अधिकच उजळून निघावा, यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदिल दाखल झाले आहेत. पर्यावरण संवर्धन व बच्चे कंपनीची आवड लक्षात घेऊन कागदापासून तयार केलेले डॉगी, झिंग चॅंग, छोटा भीम, जग्गु, हातोडी आदी बच्चे कंपनीचे आवडते कार्टुन्स असलेल्या आकारात खास कागदी कंदिल दाखल झाले आहेत. अगदी ५० ते ८० रुपये दराने त्यांची विक्री होत आहे. याशिवाय, डेकोलाईट, स्क्वेअर, लोटस, कंदिल, मंदिर, चांदणी, फ्लॉअर, बॉल, फायर बॉल हे कागदापासून तयार केलेले कंदिल सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. ग्राहकांसाठी हे विविध प्रकारचे आकाशकंदिल ३० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय अनार करंजी, बलून, साधा कंदिल हे चायना प्रकार १५० ते ३५० रूपये दराने विक्रीसाठी आहेत. चायना प्रकारात यंदा हंडी स्टाईल आकाश कंदिलने सर्वाना भुरळ घातली आहे. यामध्ये साधी हंडी यांसह थ्रीडी इफेक्ट जाणावणारी सोनेरी मुलामा असलेल्या हंडीला मागणी आहे. सोनेरी किनार असलेल्या विविध रंगातील हंडीला आतून क्रिस्टल लावण्यात आले आहे. लाईट सुरू झाल्यावर आतील बाजूचा गोल फिरू लागतो. त्यातून विविधरंगी प्रकाशझोत बाहेर फेकला जात असला तरी पाहणाऱ्याला थ्रीडी इफेक्टचा भास होतो. ६५० रुपयांपर्यंत तो उपलब्ध आहे. यंदा ग्राहकांनी कापडी व चायना प्रकारांकडे पाठ फिरवली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. चायना प्रकाराविषयी दिवसेंदिवस तक्रारी वाढत असतांना ग्राहकांनी करंजी, व चांदण्या त्यातही विशेषत केरळकडील रचनेतील आकाश कंदिलला पसंती दर्शविली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत आकाशकंदिलमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यासाठी पेट्रोल, डिझेल यांची झालेली दरवाढ जशी कारणीभूत आहे. तसेच कामगारांची मजुरी, कच्चा मालाचे वाढलेले भाव यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत भावांमध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचे जे. के. आर्टचे जय कोंडीलकर यांनी सांगितले. सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी गर्दी वाढत असतांना वीज भारनियमनामुळे धंद्यावर परिणाम होतो. भारनियमन करायचे असेल तर दिवसाकाठी करा, ग्राहक आपला माल ठोक बजावून घेत असतांना लाईटच्या अभावी धंद्यावर परिणाम होतो. तसेच रात्रीच्या वेळी मोकाट कुत्रेही परिसरात उच्छाद मांडत असल्याच्या तक्रारी विक्रेत्यांनी केल्या. एकिकडे रेडिमेड आकाश कंदिलची मागणी वाढत असतांना होम मेड आकाशकंदिलाची क्रेझ आजही कायम आहे. बांबुच्या काठय़ा, रंगीत झिलेटीन पेपर किंवा पताका कागद आदी साहित्याचा वापर करत बच्चे कंपनी कंदिल तयार करण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.
दिपोत्सव:चायनीज् आकाशकंदिलांपासून ग्राहक दूर
दिवाळीचा बाजार म्हणजे त्यात ‘आकाशकंदिल’ ला हमखास स्थान. दिवाळीच्या यादीतील आपले स्थान आजतागायत आकाशकंदिलने कायम राखले आहे. दिवाळी उंबरठय़ावर आल्याने तिच्या स्वागतासाठी नाशिकची संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली असली तरी बाजारपेठेत नव्याने दाखल झालेले आकाशकंदिलचे विविध प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
First published on: 06-11-2012 at 02:35 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customer away from chinese akashkandil