दुबई येथील दुबई शॉपिंग फेस्टिव्हलसाठी जाणाऱ्या पर्यटकांना रोमिंग शुल्कात मोठय़ा प्रमाणात कपात देण्याची एक योजना व्होडाफोन या मोबाइल कंपनीने फेब्रुवारी २०१० मध्ये जाहीर केली होती. या सुविधेचा लाभ मुलुंडमधील एका ग्राहकाने घेतला. मात्र तरीही या ग्राहकाला कंपनीने नंतर अवाजवी देयक पाठवून ते भरण्याचा तगादा लावला. ते देयक भरणा केले नाही म्हणून त्या ग्राहकाची मोबाइल सेवा खंडित केली. याप्रकरणी ग्राहकाने ग्राहक मंचाकडे दाद मागितली. ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जवळीकर, सदस्य ना. द. कदम यांनी व्होडाफोनने ग्राहकाला अवाजवी देयक पाठवल्याचे मान्य केले. यापुढे ग्राहकाकडे कंपनीने कोणतेही वाढीव देयक मागू नये. ग्राहकाला न्यायिक खर्चापोटी २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
दुबई फेस्टिव्हलसाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी गेल्या चार वर्षांपूर्वी व्होडाफोन कंपनीने रोमिंग शुल्कामध्ये सूट देण्याची सुविधा ग्राहकाला उपलब्ध करून दिली होती. या सुविधेचा लाभ मुलुंडमधील एक रहिवासी व कल्याण जनता सहकारी बँकेतील कर्मचारी अशोक सावळकर यांनी व्होडाफोनच्या कल्याणमधील एका गॅलरीतून घेतला होता. दुबईहून परतल्यानंतर कंपनीने अशोक सावळकर यांना १२ हजार ५८५ रुपयांचे देयक पाठवले. विशेष योजनेंतर्गत कंपनीने मोबाइल कॉलचे दर ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले होते. असे असताना वाढीव देयक पाठवल्याने सावळकर यांनी देयक कमी करण्याची मागणी कंपनीकडे केली. चुकीचे देयक दुरुस्त करण्याचे कंपनीने मान्य केले. सावळकर यांनी देयकातील ६ हजार ६०० रुपये भरणा केल्यास हा विषय संपवण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले. अशोक सावळकर यांनी ते वाढीव देयक भरणा केले. या घटनेनंतर व्होडाफोन कंपनीने सावळकर यांना पुन्हा उर्वरित देयक भरणा करण्यासाठी तगादा लावला. ते देयक भरणा न केल्याने त्यांची मोबाइल सेवा खंडित केली.
अशोक सावळकर यांनी ठाणे ग्राहक तक्रार मंचाकडे याबाबत तक्रार दाखल करून देयक दुरुस्त करण्याची व २४ टक्के व्याजासह दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. मंचाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सावळकर यांच्याकडे कंपनीने कोणत्याही रकमेची मागणी करू नये. कंपनीने ग्राहकाला सेवासुविधा पुरवण्यात कसूर केली. न्यायिक खर्चापोटी तक्रारदाराला २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा