झपाटय़ाने वाढत चाललेल्या शहरात फ्लॅट संस्कृती फोफावली आहे. कधी काळी घरापुढे असलेल्या अंगणात झाडे लावण्याचा, ती वाढवण्याचा जो आनंद होता तोही यामुळे संपला आहे. त्यामुळे घरातच कुंडय़ा ठेवून फूलझाडे लावण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर मातीच्या कुंडय़ा आणि फूलझाडे विक्रीची दुकाने उन्हाळ्यातही अनेक ठिकाणी पदपथावर थाटण्यात आली आहेत. सध्या शहरातील विविध भागात फुटपाथवर वेगवेगळ्या फुलांची, शोभेची झाडे, रोपटी आणि आकर्षक कुंडय़ा विक्रीला आल्या आहेत. उत्तर अंबाझरी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर वेगवेगळ्या फुलांची व शोभेच्या झाडांची विक्री करणारे अनेक लोक दिसून येतात. त्यांच्याजवळ २०० ते २५० प्रकारची वेगवेगळी रोपटी विक्रीला आहेत.
कळमेश्वर तालुक्यातील हुबळी गावात राहणारे यादवराव शेंदरे यांनी सहा एकर शेतीत वेगवेगळी झाडे लावली आहेत. त्यांच्या गावातच चार ते पाच नर्सरी आहेत. शेंदरे नागपूरला गेल्या सहा वषार्ंपासून हा व्यवसाय करीत आहेत. ते म्हणाले, आमच्याकडे येणारे गिऱ्हाईक शोभेची झाडे अधिक पसंत करतात. त्यांना दिवाणखान्यात ठेवण्यासाठी विविध प्रकारची शोभेची झाडे हवी असतात. वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाला सध्या चांगली मागणी आहे. झाडांना रोज पाणी देणे आवश्यक असते, पण शहरातील काही भागात पाण्याची समस्या असल्यामुळे झाडांची विक्री कमी होत आहे. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये मात्र मोठय़ा प्रमाणात विक्री होते.
 भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्य़ातून झाडे शहरात विक्रीला येतात. बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक छोटे व्यावसायिक हा व्यवसाय करण्यासाठी नागपुरात स्थायिक झाले आहेत. शहरात जागेची समस्या आहे त्यामुळे कधी उत्तर अंबाझरी मार्गावरील फुटपाथवर तर तर कधी जागा मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय करणारे अनेक लोक दिसून येतात. शोभेच्या झाडांमध्ये पाम, क्रोटन, स्टारलय, फायक्स, अशोका, रबर प्लान्ट, मनी प्लान्ट इत्यादी ५० पेक्षा अधिक झाडांचा समावेश आहे. फुलांमध्ये गुलाब, फोरलिनिया, मोगरा, पिटोनिया, जास्वंद, चाफा, गौरी चाफा, टिपू आदी प्रकार विक्रीला आहेत. अनेकदा रोपटी सुकून जातात. ज्या भागात नळ नाहीत, त्या भागात समोरच्या चौकातून पाणी आणून रोपटय़ांना दिले जाते. रोपटे लावण्यासाठी बाजारात आकर्षक कुंडय़ाही विक्रीला आहेत. सगळीकडे पाणीटंचाई असल्यामुळे त्याचा परिणाम रोपटय़ांच्या विक्रीवर झाला असल्याची कबुली शेंदरे यांनी दिली.
आज अंगण दिसेनासे झाले आहे आणि सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असला तरी काही निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी कुंडय़ांमध्ये रोपटी लावून बगिच्याची हौस पूर्ण करतात हेदेखील तितकेच खरे. यादवराव शेंदरे गेल्या पाच वर्षांंपासून हा व्यवसाय करीत आहेत. त्यासाठी त्यांनी महापालिकेची रितसर परवानगी घेतली असली तरी पोलीस अनेकदा त्रास देतात. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी येऊन अनेकदा माल घेऊन जातात, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा