दोन वर्षांंपूर्वी सुरू केलेली ‘एटीव्हीएम’ आता कायमची हद्दपार करण्याचा रेल्वेचा विचार आहे. काही वर्षांंपूर्वी सुरू झालेल्या ‘सीव्हीएम’ मशीन्सला पर्याय म्हणून एटीव्हीएम मशीन्स लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार सुमारे अडीचशेहून जास्त मशीन्स उपनगरी रेल्वे स्थानकांवर लावण्यात येणार होती. प्रत्यक्षात फार कमी मशीन्स उपनगरी स्थानकांवर लावण्यात आली आहेत. त्यातील बरीच नादुरुस्तच आहेत.सीव्हीएम किंवा एटीव्हीएम मशीन्स दुरुस्त करण्यासाठी नेमण्यात आलेल्या खासगी संस्थेचे कर्मचारी ही मशीन्स तात्काळ दुरुस्त करत नसल्याने तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होत नाहीत. नवीन खिडक्या उघडल्या तरी तिकीट क्लार्कची भरती झालेली नाही. अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याबाबत कसलाही उल्लेख नाही. त्यामुळे आता तिकीट विक्रीसाठी सीव्हीएम, एटीव्हीएमऐवजी खासगी लोकांना व्यवसायाची संधी देणाऱ्या जेटीबीएसवर भर देण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी सुरू केलेली स्मार्ट कार्ड योजनाही अशाच पद्धतीने गुंडाळण्यात आली आहे. बेस्ट, रेल्वे या दोन्ही प्रवासी वाहतुकीला चालू शकेल अशी स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आली होती. मात्र त्या कार्डाचा उपयोग नेमका कसा करायचा यासाठी माहिती देणारी यंत्रणाच बंद झाल्याने आणि रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली कार्ड स्वाइप यंत्रे नादुरुस्त झाल्यावर त्यांच्या देखभालीचा खर्च कोणी उचलायचा याबाबत प्रश्न निर्माण झाल्यावर ही योजना बंद करण्यात आली होती. अद्यापही काही स्थानकांवर ही यंत्रे बंद अवस्थेत पाहण्यास मिळतात.
प्रत्येक स्थानकावर सरकते जिने लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. यासाठी निधी मंजूर झाला असला तरी अद्याप एकाही स्थानकावर हे जिने लागलेले नाहीत. मार्च महिन्यामध्ये पहिला सरकता जिना ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा