सायकलभ्रमण करताना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी सीएसी ऑलराउंडरने तरुण-तरुणींना उपलब्ध करून दिली असून येत्या २२ आणि २३ डिसेंबरला रामटेक-पेंच धरण-कोलितमारा-सिल्लारी-मोगरकसा-अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज अशा १०७ किलोमीटरचे सायकल निसर्ग पर्यटन आयोजित केले आहे.
दोन टप्प्यात आयोजित सायकल एक्स्पिडिशनसाठी पहिल्या टप्प्यात २२ डिसेंबरला अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज रामटेक-पेंच डॅम-कोलितमारा (४४ किमी) असा मार्ग असणार आहे. कोलितमारा येथे रात्री मुक्कामानंतर दुसऱ्या टप्प्यात कोलितमारा-सिल्लारी-मोगरकसा-अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज रामटेक (६३ किमी) या मार्गाने भ्रमण करावे लागेल. या सायकल भ्रमंतीसाठी २१ डिसेंबरला सकाळी ६ वाजता पर्यटकांना त्यांच्या सीएसी ऑलराऊंडरच्या धरमपेठ येथील कार्यालयात संपर्क साधावा लागेल. यावेळी स्पर्धकांना आवश्यक सूचना दिल्या जातील. दुसऱ्या दिवशी, २२ डिसेंबरलाही सकाळी ६ वाजता सायकल एक्स्पिडिशन सुरू होण्यापूर्वी स्पोर्ट्सवेअर, स्पोर्ट शूज, स्वत:ची औषधे, थंडीचे कपडे आदी आवश्यक  पण कमी वजनाच्या वस्तू सोबत बाळगायच्या आहेत. अठरा वर्षांवरील तरुण-तरुणी या भ्रमंतीत सहभागी होऊ शकतील, मात्र पर्यटनाला येण्यापूर्वी त्यांनी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. निसर्गभ्रमंतीदरम्यान त्यांना इको हट्स किंवा तंबूत राहण्याची आणि चहा, नाश्ता, जेवण आदी सुविधा देण्यात येतील.
सायकलने निसर्ग भ्रमंती करताना अनुभवी मार्गदशर्काच्या मार्गदशर्नाखाली पक्षी निरीक्षण, वन्यजीव निरीक्षण, निसर्ग पर्यटकांना जवळून अनुभवता येणार आहे. पर्यटनात सहभागी होण्यासाठी येत्या १७ डिसेंबरपर्यंत नोंदणी करायची आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी सीएसी ऑलराउंडर, धन्वंतरी रु ग्णालयामागे, खरे टाऊन, धरमपेठ नागपूर, दूरध्वनी क्रमांक- ०७१२-३२७१७२७ किंवा ९३७०७७२२२७, ९३७२३३४०६४ येथे संपर्क साधावा.
अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज रामटेकला सकाळी ७.३० ला पोहोचल्यानंतर सर्व पर्यटकांना आधी नाश्ता देण्यात येईल. त्यानंतर सकाळी ८.३0ला सायकल पर्यटनाला सुरु वात होईल. सकाळी १०.३० ला नवेगाव खरी(पेंच नदी) पोहचल्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेऊन पुन्हा एकदा ११ वाजता कोलितमाराकडे कूच करण्यात येईल. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा येथे दुपारी १ वाजता पर्यटक पोहोचल्यानंतर जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. जेवणानंतर निसर्ग पायवाटेने जात दुपारी पक्षी आणि वन्यजीव निरीक्षणाचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. रविवारचा सायकल ट्रेक कोलितमारा-सिल्लारी-मोगरकसा-अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज रामटेक (६३ किमी) असा असून कोलितमाराहून पुन्हा सकाळी ६ वाजता सुरु वात होईल.      

अंतर तक्ता
अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज रामटेक-नवेगाव खरी(पेंच डॅम)-२0 किमी
नवेगाव खरी(पेंच डॅम)-कोलितमारा-२४ किमी
कोलितमारा-किरंगीसर्रा-सिल्लारी-१४ किमी
सिल्लारी-पवनी-मोगरकसा-२३ किमी
मोगरकसा-अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज रामटेक-२६ किमी