‘सेव्ह टायगर’ हा संदेश देत जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्ली वनपरिक्षेत्रात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर मोहुर्ली व देवाडा परिसरात २० किलोमीटर सायकल रॅली फिरली. या रॅलीत वन अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांच्यासह ७० जण सहभागी झाले होते.
जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनच्या वतीने १ ते ७ सप्टेंबपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांसोबतच सेव्ह टायगर हा संदेश देण्यासाठी व मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृतीसाठी ग्रामसभा, रॅली, प्रबोधनात्मक चित्रपट, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, बफर क्षेत्रातील गावातील युवकांकरिता स्वयंरोजगार प्रशिक्षण व वन्यजीवाचे महत्व पटवून देणारे पथनाटय़ इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ताडोबा प्रकल्पात मोहुर्ली वनपरिक्षेत्रात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी बफरचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, ताडोबा कोअरचे उपवनसंरक्षक सुजय दोडल, विभागीय वनाधिकारी एम.एम.कुळकर्णी, एन.डी.चौधरी, गिरीश वशिष्ठ, सहायक वनसंरक्षक अरुण तिखे, कांचन पवार व स्वप्नील घुरे उपस्थित होते.
मोहुर्ली येथून सकाळी ६.४५ वाजता निघालेली ही रॅली मोहुर्ली, देवाडा व परिसरातील गावे करत २० किलोमीटरचा फेरफटका मारला. यावेळी ‘सेव्ह टायगर, सेव्ह जंगल’ हा संदेश देण्यात आला. यात परिसरातील गावकऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. ताडोबात रॅली आयोजित केली असल्याने सर्वत्र वन्यजीव बचावाचे संदेश देण्यात आले. वाघांसोबतच इतरही वन्यजीवांची शिकार होऊ देऊ नका, असे संदेश गावकऱ्यांना देण्यात आले.
वन विभागाचे बफर झोनमधील नवेगांव यशस्वी पुनर्वसन केले असून ताडोबा प्रकल्पात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. टायगर कंझव्‍‌र्हेशन फाऊंडेशनमध्ये यावर्षी तीन एक कोटीचा निधी आजूबाजूच्या गावाच्या विकासासाठी खर्च केला जाईल. वन्यप्राणी-मानव संघर्ष कमी करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन स्वयंसेवकांनी केले. यावेळी गजेंद्र नरवणे, एम.एम.कुळकर्णी, सुजय दोडल, एन.डी.चौधरी यांनी वन्यजीव सप्ताहादरम्यान आपापल्या विभागात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

Story img Loader