सायकलवेडय़ा डॉक्टरसहीत सायकलचे महत्त्व सांगणाऱ्या बातमीची दखल वसई विरार महापालिकेने घेतली आहे. पालिकेने प्रत्येक रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला असून सध्या शहरातील ४२ किलोमीटरच्या रिंगरूटवर सायकल ट्रॅक उभाण्याचे कामही सुरू केले आहे.
विरार शहरातील एक डॉक्टर नितीन थोरवे गेल्या काही वर्षांपासून सायकलचा प्रसार करीत आहेत. सायकल चालविण्याचे फायदे लोकांपर्यत पोहोचावे, त्यांच्यात सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ते भारत आणि परदेशात सायकलभ्रमण करत असतात. त्यांच्या या मोहिमेचे वृत्त लोकसत्ताने २९ ऑक्टोबरच्या (मुंबई वृत्तान्त) प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल वसई विरार महापालिकेने घेतली आहे. नागरिकांना विनाअडथळा सायकल चालविता यावी यासाठी संपूर्ण शहरात सायकल ट्रॅक तयार करायचे पालिकेने ठरविले आहे.  याबाबत वसई विरारचे महापौर राजीव पाटील यांनी सांगितले की, ‘लोकसत्ता’च्या वृत्तामुळे सायकलचे फायदे आणि आमच्याच शहरात सायकलसाठी जनजागृती होत असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही शहरातल्या ४२ किलोमीटरच्या रिंगरूटवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारत आहोत. तसेच यापुढे शहरात तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन रस्त्यावर सायकल ट्रॅक असेल, असा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. प्रदूषण रोखून आणि आरोग्य जपण्यासाठी सायकल चालविणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळेच मी स्वत: पत्नीसह दररोज सायकल चालवायला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सायकलींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सायकल मॅरेथॉन स्पर्धाही आयोजित करणार आहोत. विशेष सायकल स्टॅण्ड उभारण्याचाही पालिकेचा विचार आहे, असे राजीव पाटील यांनी सांगितले.
मुंबईत सायकल
ट्रॅकचा प्रयत्न फसला
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसी येथे मोठा गाजावाजा करून सायकल ट्रॅक उभारला होता. पण कोटय़वधी रुपये खर्च करूनही हा प्रयत्न फसला. याबाबत पाटील म्हणाले की, मुळात बीकेसी हा व्यावसायिक भाग आहे. तेथे सरकारी वसाहत सोडल्यास नागरी वस्ती आसपास नाही. तेथील सायकल ट्रॅकच्या त्रुटींचा आम्ही यापूर्वीच अभ्यास केला असून आम्ही तयार करत असलेला ट्रॅक नागरी वस्तीत असेल आणि वापरायला सोपा असेल. बीकेसीमध्ये फक्त सायकल चालविण्यासाठी कुणी जात नाही. दैनंदिन वापरात या ट्रॅकचा उपयोग होईल याची आम्ही दक्षता घेणार आहोत.
मी राहात असलेल्या वसई विरार महापालिका क्षेत्रातच सायकल टॅक तयार होत आहे, ही आंनददायी बाब आहे. आम्ही करीत असलेल्या जनजागृतीचे हे फळ आहे. हरित वसईच्या पट्टयातील लोक रोज रेल्वे स्थानकात मोटार सायकली घेऊन येतात. त्यांनी मोटारसायकलींऐवजी सायकली आणल्या तर वसईचे हरितपण टिकून राहील. वृत्तान्तमधील बातमी वाचून सायकलींबाबत मार्गदर्शन मागणारे अनेक जण संपर्क करीत आहेत – डॉ. नितीन थोरवे

सायकल ट्रॅकवरचा पैसा वाया
‘एमएमआरडीए’ने वांद्रे-कुर्ला संकुलात सुमारे साडेचार कोटी खर्च करून सायकल ट्रॅक बांधला. सायकलीच्या वापराला उत्तेजन देण्यासाठी सायकल ट्रॅकची योजना आखण्यात आली होती. परंतु, या ट्रॅकचा वापर फारसा न झाल्याने हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला. नंतर खुद्द एमएमआरडीएच्या वरिष्ठांनीच हा प्रकल्प बिनकामाचा असल्याची ग्वाही दिली होती. कुठलेही सव्‍‌र्हेक्षण न करता हा प्रकल्प कार्यान्वित केल्याचे पुढे स्पष्ट झाले. त्यामुळे, या ट्रॅकवर खर्चलेला करदात्यांचा कोटय़वधी पैसा वाया गेल्यात जमा आहे.

Story img Loader