सवलतीच्या दरातील सिलििडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत. यासाठी वर्षभरात अगदी कमी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या शोधात हे कर्मचारी सध्या गुंतले आहेत.
घरोघरी सिलिंडर पोहोचविणारे कर्मचारी अनेक वेळा हेराफेरी करून ग्राहकांचा सिलिंडर भलत्यालाच दामदुपटीने विकून मोकळे होतात. हॉटेल, उपहारगृहे, नोंदणी न केलेले नागरिक आदींना ते अनधिकृतपणे सिलिंडर विकून पैसा कमावतात. कर्मचाऱ्यांच्या या उपद्व्यापामुळे नोंदणी नोंदणी करूनही वेळेत सिलिंडर न आल्यामुळे ग्राहक मेटाकुटीस येतो. एजन्सीच्या कार्यालयात जावे तर तेथील कर्मचारी उलटसुलट उत्तरे देतात. ‘घरचा सिलिंडर घेऊन या आणि भरलेला सिलिंडर घेऊन जा’ असे फर्मानच ते सोडतात. अडलेला ग्राहक गुमान स्वत: सिलिंडर घेऊन येतो आणि भरलेला घेऊन जातो. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही.
काही वेळा एखाद्या ग्राहकाच्या नावाने सिलिंडरची नोंदणी केली जाते. परंतु ग्राहकाला मात्र त्याची कल्पनाच नसते. त्याच दरम्यान त्याच्या घरचा सिलिंडर संपला आणि नोंदणीसाठी तो एजन्सीत गेला तर तुमचा सिलिंडर घरी पोहोचता झाल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात त्यांचा सिलिंडर भलत्याच व्यक्तीला विकलेला असतो. परंतु हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कार्यालयातील कर्मचारी ग्राहकालाच उलटसुलट प्रश्न विचारून भेडसावून टाकतात.
आता प्रत्येकाला वर्षांकाठी सवलतीच्या दरात केवळ सहा सिलिंडर देण्याच्या घोषणेमुळे ग्राहक सतर्क झाले आहेत. त्यामुळे काळाबाजार करणारे कर्मचारी धास्तावले आहेत. आपल्या यादीतील मंडळींना सिलिंडर कसा द्यायचा अशा विवंचनेत ते पडले आहेत. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी संगनमत करून वर्षभरात कोण किती सिलिंडर घेतो याची माहिती ते काढत आहेत. एकटे-दुकटे राहणारे ग्राहक या कर्मचाऱ्यांच्या रडारवर असून अशा ग्राहकांची यादी तयार केली जात आहे. या ग्राहकांचे सवलतीच्या दरातील सिलिंडर भलत्यालाच विकण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यापुढे ग्राहकांनी सिलिंडरची नोंदणी दूरध्वनीवरून करण्याऐवजी थेट एजन्सीच्या कार्यालयात जावे आणि दिलेल्या नोंदणी पुस्तिकेत नोंद करूनच सिलिंडर नोंदवावा. अन्यथा भविष्यात आपल्या वाटय़ाचा सवलतीच्या सिलिंडरचा काळाबाजार होऊ शकतो.
एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान!
सवलतीच्या दरातील सिलििडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत.
First published on: 08-11-2012 at 11:59 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cylinder worker searching to do frod in cylinder quata