केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे (सीझेडए) सदस्य सचिव बी.एस. बोनल यांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला मंगळवारी दिलेल्या आकस्मिक भेटीनंतर प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. वन्यप्राणी सांभाळता येत नसतील तर ते वनविभागाकडेसोपवा किंवा प्राणिसंग्रहालय दुसरीकडे स्थानांतरित करा, अशा कडक शब्दात महाराजबाग व्यवस्थापनाची बोनल यांनी कानउघाडणी केली होती. प्रस्तावित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या तयारीचीही बोनल यांनी पाहणी केली.
देशभरातील प्राणिसंग्रहालयांचे नियंत्रण करणाऱ्या सीझेएला महाराजबागेच्या एकंदर व्यवस्थेवर समाधान नसल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी सीझेएने महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता २०१४ पर्यंत वाढविली आहे. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या महाराजबागेच्या व्यवस्थापनावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रश्नचिन्ह लागले आहे. मंत्र्याने पिंजऱ्यात शिरून वाघाच्या बछडय़ांना दूध पाजण्याच्या प्रकारापासून प्राण्यांचे मृत्यू, अपुरी जागा, नाल्यामुळे होणारे प्रदूषण या मुद्दय़ांमुळे महाराजबाग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
महाराजबागेच्या प्रगतीबद्दल आपण एक टक्कादेखील समाधानी नाही, अशा स्पष्ट शब्दात बी.एस. बोनल यांनी महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांची कानउघाडणी केली. यात लवकरात लवकर सुधारणा करण्याचा इशारा देतानाच गैरव्यवस्था कायम राहिल्याचे दिसून आल्यास महाराजबागेची मान्यता काढून घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. बोनल यांच्या अचानक भेटीने महाराजबाग प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडवली. बोनल यांनी प्राणिसंग्रहालयातील कोल्ह्य़ांचा पिंजरा बदलण्याचे, वन्यप्राण्यांना भरवण्याची व्यवस्था अधिक सुधारण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.  
गैरव्यवस्थेबद्दल व्यवस्थापनाला त्यांनी चांगलेच धारेवर धरले. प्राणिसंग्रहालयाचे जुने नियम वेगळे होते आणि कालौघात या नियमात मोठे फेरबदलझाले आहेत. मात्र, महाराजबाग प्राणिसंग्रहालय आजही ५० वर्षांपूर्वीच्या नियमांनुसार चालत आहे. गंजलेल्या छोट्या िपजऱ्यात आणि अंधार कोठडीत वन्यप्राणी ठेवण्यापेक्षा ते इतर प्राणिसंग्रहालयाला हस्तांतरीत करा, नियमानुसार खुल्या आणि नसíगक वातावरणात खुल्या पिंजऱ्यांमध्ये प्राण्यांना ठेवणे आवश्यक असताना महाराजबाग व्यवस्थापन बदलायला तयार नाही, असेही बोनल यांनी सुनावले. प्राणिसंग्रहालय हवे असेल तर नव्या नियमानुसार त्यात लवकरात लवकर सुधारणा करा. यावेळी त्यांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.
कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता व प्राणिसंग्रहालय नियंत्रक डॉ. प्रदीप इंगोले आणि डॉ. सुनील बावस्कर यांनी यावेळी बोनल यांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु, ते काहीही ऐकण्यास तयार नव्हते.    

Story img Loader