* मनसेच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये नाराजी
* रिक्षा, बसेसनाही मज्जाव
* चाकरमान्यांचे हाल
* ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईत व्यवहार सुरळीत
राज ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ऐन परीक्षांच्या हंगामात विद्यार्थी, पालकांना वेठीस धरीत अंबरनाथ, बदलापूर ही दोन्ही शहरे बुधवारी बंद पाडली. ठाण्यातही मंगळवारी रात्री पाचपाखाडी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून बुधवारी संयम पाळला. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या भागांतील मनसेच्या कार्यकर्त्यांनीही परीक्षांचे कारण पुढे करीत सबुरीचे धोरण स्वीकारले. मात्र अंबरनाथ-बदलापूरमध्ये राज ठाकरेंच्या नावाने मनसैनिकांनी बंद पाळून एक प्रकारे शक्तिप्रदर्शन घडविल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अहमदनगर येथे राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे वृत्त थडकताच मंगळवारी रात्री उशिरा ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक केली. जितेंद्र आव्हाड यांची सद्दी चालणाऱ्या या कार्यालयावर दगडफेक होताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या ठिकाणी मोठय़ा संख्येने जमले. त्यामुळे या भागात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री घडलेल्या प्रकारामुळे पोलीसही काहीसे सावध झाले आणि त्यांनी ठाण्यातील कानाकोपऱ्यांत बंदोबस्त वाढविला, तसेच काही मनसे कार्यकर्त्यांनाही तंबी देण्यात आली. मंगळवारी रात्री केलेल्या दगडफेकीनंतर बुधवारी दिवसभर मात्र ठाण्यातील मनसे कार्यकर्ते शांत राहिले. बारावीची परीक्षा सुरू असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ देऊ नका, अशा सक्त सूचना देऊन मनसेच्या शहर शाखेने एक प्रकारे समंजसपणा दाखविला. कल्याण आणि विशेषत: डोंबिवली भागात मनसेची चांगली ताकद आहे. तेथेही परीक्षांचे कारण पुढे करीत पक्षाचे कार्यकर्ते दिवसभर शांत राहिले. मात्र अंबरनाथ-बदलापूरमध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चेव चढला आणि सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यांत मनसे कार्यकर्त्यांची दंडुकेशाही सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बदलापूर येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा पुतळा जाळल्याने या भागातील वातावरण तंग बनले होते. दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास अंबरनाथ (पूर्व) येथील शिवाजी चौकात मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले आणि दुकाने बंद करू लागले. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या भागात जमले आणि दुकाने बंद करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखू लागले. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग बनले होते. मात्र स्थानिक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे शिवाजी चौकातील धुमचक्री टळली तरी शहराच्या इतर भागांत मात्र मनसे कार्यकर्त्यांनी सर्व व्यवहार बंद पाडून दबंगगिरीचे दर्शन घडविले. शाळेच्या बसेस आणि रिक्षाही बंद पाडण्यात आल्या. त्यामुळे परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. सकाळच्या वेळेत कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, शाळेच्या बसेस आणि रिक्षा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दुपारी पत्रकारांना दिली. प्रत्यक्षात मात्र चित्र नेमके उलट दिसत होते.

Story img Loader