अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार महिने उलटले असून या हत्याप्रकरणाचा छडा अद्याप लागला नाही. यापूर्वी राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे सापडल्याचे विधान आपण केले होते, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देत राज्याच्या गृहखात्याला उघडे पाडले. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होण्यासाठी जोपर्यंत राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करीत नाही, तोपर्यंत त्यात केंद्र हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शनिवारी दुपारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आतापर्यंत राज्याच्या पोलीस तपास यंत्रणेला कोणतेही धागेदोरे हाती मिळाले नसल्याचे नमूद केले. यापूर्वी या प्रकरणात धागेदोरे मिळाले असून लवकरच मारेकऱ्यांना पकडण्यात येईल, असे विधान शिंदे यांनी केले होते. परंतु हे विधान आपण के वळ राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच केले होते. प्रत्यक्षात मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागला नाही किंवा या हत्येमागे कोणत्या शक्ती आहेत, याचाही सुगावा लागला नसल्याचे त्यांनी मान्य केले.
राज्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीअंतर्गत चाललेला कलगीतुरा व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्दय़ावर छेडले असता शिंदे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शी असून त्यांचा कारभार उत्तम प्रकारे सुरू असल्याचा निर्वाळा दिला.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे मुदतीत होतील, असे भाकित वर्तविले. काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी हेच असतील व त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुका जिंकण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपने चार राज्यात सत्ता मिळविली असली तरी यापूर्वीचा इतिहास पाहता २००४ साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीनेच जिंकल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून येईल. नरेंद्र मोदींची लाट ही सारी बकवास असल्याचा शेराही शिंदे यांनी मारला.
दाभोलकर हत्येचा सीबीआय तपास राज्याच्या शिफारशीशिवाय नाही-शिंदे
यापूर्वी राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे सापडल्याचे विधान आपण केले होते, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देत राज्याच्या गृहखात्याला उघडे पाडले.
First published on: 22-12-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabholkar murder cbi enquiry governor recommendation sushilkumar shinde solapur