मनात नसताना पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना केवळ ‘दादा’गिरीमुळे उमेदवारी स्वीकारावी लागल्याची चर्चा बीडमध्ये बुधवारी दिवसभर सुरू होती. आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून मताधिक्य दिले, तरच विधानसभेस उमेदवारीचा विचार होईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी बजावल्याने पक्षाअंर्तगत उमेदवारीचा ‘डाव’ यशस्वी झाला, असे मानणारे आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडीसाठी गठीत केलेल्या समितीतील एका सदस्याने या वृत्तास दुजोरा दिला.
बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास कोणीच इच्छूक नसल्याची चर्चा गावपातळीपर्यंत गेली. पक्षांर्तगत राजकारणातून सुरुवातीपासूनच अजित पवार टीमने पालकमंत्री क्षीरसागर यांनाच उमेदवारी द्यावी, या साठी मोच्रेबांधणी केली. पण क्षीरसागर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यामुळे राज्यमंत्री सुरेश धस यांचे नाव चच्रेत होते. दरम्यान, मागील आठवडय़ात मंत्री धस, आमदार प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन शरद पवार यांना लोकसभेसाठी पालकमंत्री क्षीरसागरच सक्षम उमेदवार असल्याचे पटवून दिल्याचे वृत्त धडकले होते. क्षीरसागरांचे निकटवर्तीय मात्र ते उमेदवारी घेणार नाहीत, असे जाहीरपणे सांगत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान, पक्षाने उमेदवार निवडीसाठी समिती जाहीर केली. त्यात क्षीरसागर यांच्यासह आमदार विक्रम काळे व माजी आमदार उषा दराडे यांचा समावेश होता. त्यामुळे क्षीरसागर उमेदवार नसतील असे मानले जात असल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वासही टाकला होता. परिणामी दादा गटाने राजकीय बळ एकवटून अखेर दबावशस्त्र पाजळले.
मागच्या वेळी खासदार मुंडे यांना राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातूनही मताधिक्य मिळाले होते; पण संबंधित आमदारांवर पक्षाने काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे या वेळी पक्षाचे आमदार असलेल्या पाचही मतदारसंघांतून उमेदवाराला मताधिक्य देण्याची अट घातली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळणार नाही, त्या आमदाराला उमेदवारी देण्याबाबत पक्ष विचार करेल, असेही बजावण्यात आले. त्यामुळे पक्षांर्तगत राजकारणात क्षीरसागरना उमेदवार करण्याचा ‘डाव’ यशस्वी करणारे दादा गटाचे आमदाराही मतदारसंघातून मताधिक्य न मिळाल्यास अडचणीत येणार आहेत.

Story img Loader