दादर रेल्वे सुरक्षा दलाचा भोंगळ कारभार
सार्वजनिक ठिकाणी पचापच थुंकणाऱ्यांविरोधात जनजागृतीची मोहीम राबविणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहून गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी लोकजागृती करणाऱ्यांनाच तुरूंगात डांबण्याची दबंगगिरी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाने(आरपीएफ) सुरू केली आहे.
गेल्या चार माहिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांविरोधात संगणक अभियंता असलेला कृष्णा चव्हाण हा ३२ वर्षीय तरुण गेल्या चार महिन्यांपासून रेल्वे स्टेशन परिसर थुंकीमुक्त करण्यासाठी जनजागृतीची अभिनव माोहिम राबवत आहे. ‘आपले स्टेशन, आपला भारत देश थुंकीमुक्त करण्याचा एकच मार्ग-पब्लिक धुलाई, थुंकणाऱ्यांना पकडा, मारा, फटके द्या, तरच हा देश स्वच्छ सुंदर होईल’ असे आवाहन करण्याची मोहीम त्याने हाती घेतली असून छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट आणि दादर स्थानकात सुरू असलेल्या या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळी थुंकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे पोलिस आणि आरपीएफबद्दलही प्रवाशांमध्ये नाराजीची भावना पसरत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आरपीएफ अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची मोहिमच मोडू काढण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवडय़ात पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील पुलावर चव्हाण नेहमीप्रमाणे हातात फलक घेऊन उभे असताना आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. विनापरवाना समाजसेवेची जाहीरात करीत असल्याबद्दल ही अटक करण्यात येत असल्याचे सांगत या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांना मोहिम बंद करा, नाहीतर दर आठवडय़ाला एक केस दाखल करू अशी धमकी दिली. यावेळी त्यांनी विनातिकीट स्थानकात आल्याचा गुन्हाही दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र चव्हाण यांच्याकडे मध्य रेल्वेचा पास असल्याने पुलावर उभे राहण्याचा अधिकार असल्याची भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतल्याने पोलिसांना नमते घ्यावे लागले. आपण केवळ जनजागृती करीत असून कोणालाही त्रास देत नाही, उलट फेरीवाले प्रवाशांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई करा असे चव्हाण यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जास्त बोललास तर जेलमध्येच टाकू अशी दमबाजी करीत आरपीएफवाल्यांनी चव्हाण यांना थेट मुंबई सेंट्रेल येथील रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयानेही त्यांना एक महिन्याची कैद वा ३०० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. अखेर ३०० रूपये दंड भरून चव्हाण यांनी आपली सुटका करून घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा