कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने बुधवारी रात्रीच ‘ढाक्कुमाकुम टाक्कुमाकुम’च्या तालावर थिरकणाऱ्या गोविंदांचा आवाज मुंबईत घुमला आणि ठिकठिकाणी मध्यरात्री १२ च्या ठोक्याला दहीहंडी फोडून कृष्णजन्म साजरा झाला. रात्री उशीरा विसावलेल्या गोविंदांची गुरुवारी भल्या पहाटेपासून लगबग सुरू झाली आणि हळूहळू दहीकाल्याचा जल्लोष टीपेला पोहोचला. ठिकठिकाणच्या मानाच्या दहीहंडय़ाचा वेध घेत मुंबईतील गोविंदा पथकांचे पाय ठाण्याच्या दिशेने वळले. मात्र प्रसिद्धीचा सोस असलेल्या आयोजकांची पैशांची उधळपट्टी आणि मोठय़ा बक्षिसांच्या हव्यासापोठी गोविंदा पथकांमध्ये लागलेली चुरस हेच विचित्र चित्र मुंबई-ठाण्यात दिसू लागल्याने, गोविंदा हा ‘सण’ राहिला नाही, तर ‘इव्हेन्ट’ झाल्याची पुरती साक्ष आज मुंबईकरांना पटली.
वाढती महागाई, बेरोजगारी, असुरक्षित जीवन, महिलांवरील वाढते हल्ले आदी असंख्य समस्यांचे ओझे डोक्यावर असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून दहीकाला उत्सवासाठी मोठय़ा संख्येने गोविंदांची पथके रस्त्यावर उतरली. राजकीय नेते आणि बडय़ा प्रायोजकांच्या प्रतिमा असलेले रंगीबेरंगी टी शर्ट परिधान करून आणि प्रायोजित केलेल्या वाहनांच्या टपावर बसून ढोल-ताशाच्या तालावर थिरकत रस्तोरस्तीच्या दहीहंडय़ांचा वेध घेत गोविंदा पथकांचा मुंबईत संचार सुरू होता… मुंबईच्या डबेवाल्यांनीही यंदा दहीकाल्याचा आनंद लुटला. गिरगावमधील ठाकूरद्वार नाक्यावर बांधलेली मानाची दहीहंडी फोडून मुंबईचे डबेवाले आपल्या रोजच्या कामावर मार्गस्थ झाले. गुरुवारी सकाळपासून कुलाबा, चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, दादर, परळ आणि उपनगरांमध्ये दहीकाल्याचा उत्साह ओसंडून वाहू लागला होता. ठिकठिकाणी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर स्थानिक नेते सिने अनभनेते-अभिनेत्रीसह मिरवित होते. कर्णकर्कश्श आवाजात ठणाणणाऱ्या डीजेच्या तालावर थिरकणारे पाय आणि पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये नखशिखांत भिजून जल्लोष करणारे रंगीबेरंगी वेषात नटलेले लहानथोर गोविंदा असे चित्र सर्वत्र दिसत होते. बस, ट्रक, टेम्पो, जीप आणि दुचाकीवरुन गोविंदा पथके स्वैरपणे संचार करीत होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेते ठिकठिकाणी दहीहंडय़ा बांधून गोविंदा पथकांवर मोठय़ा पारितोषिकांची खैरात करीत होते. दहीहंडी फोडून मिळणाऱ्या पारितोषिकांनी आपली घागर भरण्यासाठी गोविंदांची प्रचंड धावपळ सुरू होती. त्यासाठी दुचाकीवरुन फिरुन मोठय़ा पारितोषिकांच्या दहीहंडय़ा शोधण्यात काही गोविंदा व्यस्त होते. तर मोबाइलवरुन संदेश मिळताच गोविंदा पथके मोठय़ा पारितोषिकाच्या दहीहंडीखाली गोळा होताना दिसत होते. प्रसिद्धीसाठी पैशांची उधळण करण्यात आयोजक, तर मोठी पारितोषिके मिळविण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये अहमहमिका लागली होती. त्यामध्ये दहीकाल्याला निराळाच रंग चढू लागला आहे…
रस्ते अडले
मुंबई-ठाण्यामध्ये वाहतुकीचे सर्व नियम गुरुवारी धाब्यावर बसविण्यात आले. ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली भव्य व्यासपीठ उभारुन रस्ते अडविण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीचे तिनतेरा वाजले होते. अनेक मुख्य रस्ते दहीहंडी उत्सवाने अडल्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. राज्य सरकारने दहीकाल्यानिमित्त गुरुवारी सुट्टी जाहीर केली असली तरी खासगी कार्यालये सुरू होती. वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आल्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी नोकरदारांची तारांबळ उडाली. अखेर नजिकच्या रेल्वे स्थानकात धाव घेऊन नोकरदारांना कार्यालय गाठावे लागले.
वाहतुकीचे नियम धाब्यावर
बस, ट्रक, टेम्पोमधून गोविंदा पथके मनमानेल त्या ठिकाणी फिरत होते. वाटेल तेथे वाहने उभी करुन दहीहंडय़ा फोडण्यासाठी जात होते. त्यामुळे वाहतुकीचा पुरता विचका झाला. दुचाकीवरुन फिरणाऱ्या गोविंदांनी तर कहरच केला होता. एका दुचाकीवर ती-चार जण बसून स्वैरसंचार करीत होते. वाहतूक नियमनासाठी चौकाचौकांमध्ये उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत सिग्नल तोडून गोविंदा भरधाव वेगात दुचाकी हाकत होते. परंतु त्यांना रोखण्याचे धाडस वाहतूक पोलिसांना होत नव्हते. तीन-चारजण स्वार झालेल्या दुचाकीचे क्रमांक काही चौकांमध्ये वाहतूक पोलीस टिपून घेताना दिसत होते. वाहतूक पोलीस दरवर्षीच दुचाकीचे क्रमांक टिपून घेतात. परंतु त्याविरुद्ध कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा