सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतरही ठिकठिकाणच्या आयोजकांनी अद्याप दहीहंडीच्या पारितोषिकांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे गोविंदा पथके संभ्रमात असून दहीहंडीच्या दिवशी मार्गनिश्चिती कशी करायची, असा प्रश्न पथकांना पडला आहे.
दरवर्षी दहीहंडीपूर्वी काही दिवस आधीच आयोजक पारितोषिकांची घोषणा करतात. कुणी सोन्या-चांदीची नाणी, चारचाकी गाडी, अथवा रोख रक्कम आदी पारितोषिके ठेवून गोविंदा पथकांना भुलविले जाते. आयोजक गोविंदा पथकांना आमंत्रणेही देतात. मात्र यंदा दहीहंडी उत्सवावरून झालेल्या वादामुळे आयोजकांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली आहे.
आयोजक शुक्रवारी पारितोषिकांच्या रकमा जाहीर करतील, अशी गोविंदांची अपेक्षा होती. त्यासाठी गोविंदा आयोजकांकडे दिवसभर विचारपूस करीत होते. मात्र रविवापर्यंत पारितोषिके जाहीर होतील, असे आयोजकांकडून सांगण्यात येत होते.
आयोजकांनी पारितोषिकांची घोषणा केल्यानंतर मार्गनिश्चिती करणे गोविंदा पथकांना सोपे जाते. ही मार्गनिश्चिती करताना प्रवासात वेळ जाणार नाही आणि वाटेतील मोठय़ा रकमांच्या दहीहंडय़ा फोडता येतील याची काळजी घेतली जाते. ठाण्यामध्ये मोठय़ा रकमांच्या दहीहंडय़ा बांधण्यात येत असल्यामुळे मुंबईतील बहुसंख्य गोविंदा दुपारनंतर तेथे रवाना होतात. मात्र यंदा विलंबामुळे गोविंदांचा गोंधळ उडाला आहे. ठाण्याइतक्याच मुंबईतील दहीहंडय़ाही महत्त्वाच्या असतात. ठाण्यात अपयश आले तर मुंबईतील दहीहंडय़ा फोडून खर्च भागविता येतो. त्यासाठीच पथकांसाठी मार्गनिश्चिती महत्त्वाची ठरते.