सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन केले तेव्हा अंधेरीकरांच्या आशा कोण पल्लवीत झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष मेट्रो सुरू होण्यास विलंब लागल्याने आता अंधेरीकरांना मेट्रो सुरू कधी होईल, याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. अशातच महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदिल दाखविला तेव्हा ना अंधेरीकरांना अपेक्षा होती ना आशा. आता तरी दिलेल्या वेळेत मेट्रो सुरू होणार का, एवढाच त्यांचा सवाल होता.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असे मेट्रोमार्गाचे नाव असले तरी प्रत्यक्षात ही मेट्रो सात बंगल्यापर्यंतच आहे. तेथून वर्सोव्याला जाण्यासाठी वेगळ्या प्रवासी साधनाचा वापर करावा लागणार आहे. सात बंगला स्थानकात मेट्रोच्या चाचणीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदिल दाखविला आणि चार डब्यांच्या मेट्रोने हॉर्न मारत मार्गक्रमण सुरू केले. स्वत: मुख्यमंत्री या गाडीत नव्हते. परंतु काही मोजक्या अधिकाऱ्यांना घेऊन मेट्रोने तेथून आजाद नगपर्यंतचा तीन किलोमीटरचा पल्ला गाठला आणि पुन्हा सातबंगल्याच्या दिशेने प्रस्थान केले. पहिली चाचणी यशस्वी झाल्याचा आनंद मेट्रोवनच्या अधिकाऱ्यांच्या; विशेषत: व्यवस्थापकीय संचालक क्रीस व्हाइट यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. परंतु अशा चाचण्या अंधेरीकर कर्कश हॉर्नच्या आवाजात गेले काही दिवस अनुभवतच आहेत. आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले इतकेच!
रिलायन्स की मुंबई मेट्रो?
‘मेट्रो’च्या उभारणीचे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आल्यानंतर ‘रिलायन्स मेट्रो वन’ ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. त्याला आक्षेप घेण्यात आल्यानंतर ‘मुंबई मेट्रोवन’ असा बदल करण्यात आला. परंतु जपानहून मागविण्यात आलेल्या मेट्रोच्या डब्यांवर ‘रिलायन्स मेट्रो’ असे लिहिलेले आढळून येते.
निव्वळ देखावा, मोठा पल्ला बाकी!
*  वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता.
*  २००६ मध्ये या मार्गाच्या कामाचे उद्घाटन झाले. त्यानंतर २००८ मध्ये पूर्ण जोमाने काम सुरू झाले. यानंतर मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याचे तब्बल सहा मुहूर्त वेळोवेळी जाहीर झाले. ते असे – १. जुलै २०१० २. सप्टेंबर २०१० ३. जुलै २०११ ४. मार्च २०१२ ५. नोव्हेंबर २०१२ आणि ६. मे २०१३. पण हे मुहूर्त गाठण्यात ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ ही कंपनी साफ अपयशी ठरली.
*  काम बराच काळ रेंगाळल्याने प्रकल्पाचा खर्चही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. ‘एमएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याची कबुली दिली. सुधारित अंदाजे खर्च तब्बल ३८०० कोटी आहे. म्हणजेच मूळ खर्चापेक्षा तब्बल १४५० कोटी रुपये जास्त. त्याचा फटका भाडेवाढीच्या रूपाने बसण्याची चिन्हे आहेत.
*  आताही मे २०१३ मध्ये संपूर्ण मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण झालेले असायला हवे होते. संपूर्ण ११.४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू व्हायला हवी होती. पण तेही धड झाले नाही. केवळ पहिल्या तीन किलोमीटर लांबीच्या टप्प्यातच चाचणी घेण्यापुरते काम झाले.
*  ‘मोनोरेल’च्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या चाचणीला बरीच प्रसिद्धी मिळाल्याने ‘मेट्रो रेल्वे’चे कामाचे अपयश ठसठशीतपणे दिसू लागले. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आणि खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या किरकोळ चाचणीचा थाट घालण्यात आल्याचे चित्र आहे.
*  मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर गेल्या दीड वर्षांपासून चाचण्या सुरू आहेत. तरी प्रत्यक्ष वाहतूक सुरू व्हायला आणखी तीन-चार महिन्यांचा अवकाश आहे. अशा परिस्थितीत मेट्रोची चाचणी तीही अगदी छोटय़ा टप्प्यात आता कुठे सुरू झाली आहे. त्यामुळे अजून मोठा पल्ला बाकी आहे.

Story img Loader