बौद्ध धर्म हा जातीवर आधारित भेदभाव करीत नसून संपूर्ण मानव जातीत बंधुभाव व प्रेम निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची माहिती असायलाच हवी, असे मत तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले.
पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असलेल्या दलाई लामा यांनी आज दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बौद्ध धर्माची शिकवण ही सत्य व कारणमीमांसेवर अवलंबून आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात प्रवेश घेऊन बौद्ध धर्माला पुनरुज्जीवित केले. बुद्धांनी जे तत्त्वज्ञान दिले ते जसेच्या तसे स्वीकारू नका. त्यात बदल करून ते स्वीकारा, असे बुद्ध म्हणत असत. यावरून विज्ञानावर आधारित या तत्त्वज्ञानावर संशोधन करणे आवश्यक असल्याचेही लामा यावेळी म्हणाले. गौतम बुद्धांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाचा पूर्वी विरोध होत होता. परंतु कालांतराने हेच तत्त्वज्ञान योग्य आहे, असे वाटत असल्याने त्याचा स्वीकार केला जात आहे. तेच तत्त्वज्ञान आज जगाला शांती देऊ शकते, अशी धारणा निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी बौद्ध धर्म स्वीकारला. भारतातील नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्मासोबतच अन्य धर्मावरही खूप सखोल चर्चा केली जात असे. याच विद्यापीठातूनच पुढे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला, म्हणूनच भारतात निर्माण झालेल्या या धर्माच्या तत्त्वज्ञानाची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.
दलाई लामा यांनी सर्वप्रथम दीक्षाभूमी येथे येऊन गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सरचिटणीस सदानंद फुलझेले यांनी दलाई लामा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अशोक मेंढे, राजन वाघमारे, संघपाल उपरे, राजा द्रोणकर आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा