धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच, यासंदर्भात संघटनांच्या मागण्या व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम आहे पण मला कराड दक्षिणेत शिरकाव करता आला नाही व तशी संधीही मिळाली नाही. पण आता जिल्हाध्यक्ष आणि मंत्री म्हणूनही संधी मिळाल्याने कराड दक्षिणेत पक्षसंघटना हुकमी आणि भक्कम करण्याची किमया करून दाखवणार असल्याचा ठाम विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
कराड तालुक्यातील तारूख येथे विकासकामांचे भूमिपूजन तसेच मंत्री शशिकांत शिंदे व आमदार नरेंद्र पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते विलासराव पाटील-वाठारकर होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे शेती सभापती किरण साबळे-पाटील, महिला बालकल्याण सभापती निलमताई पाटील-पार्लेकर, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके, कराड बाजार समितीचे सभापती दाजी पवार, कराड दक्षिण राष्ट्रवादीचे अध्यक्ष अधिकराव पाटील-शेरेकर यांची उपस्थिती होती.
शशिकांत शिंदे म्हणाले, कराड दक्षिणेत युवा कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ आहे पण जनतेच्या समस्या घेऊन जायचे कुठे व कुणाकडे हा प्रश्न होता. तो आता सुटला असून, युवकांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या थेट माझ्यापर्यंत आणाव्यात ते मार्गी लावण्याची जबाबदारी माझी असेल. राष्ट्रवादी काँग्रेस हाच कामाचा पक्ष आहे व कामाच्या माध्यमातून जनतेत जावू या. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात धरणग्रस्तांची संख्या जास्त आहे व त्यांच्या न सुटलेल्या समस्याही तितक्याच जास्त आहेत. धरणग्रस्तांच्या व डोंगर कपारीतल्या जनतेने राज्याचे अनेक भाग सुजलाम सुफलाम केले पण धरणग्रस्तांचे प्रश्न का सुटत नाहीत? दुसऱ्यापेक्षा मी जास्त मिळवून देऊ शकतो अशी आमिषे दाखवून धरणग्रस्त विखुरले जातात व त्यांच्या समस्या वाढतात. हे सुध्दा त्यामागील कारण आहे. मात्र, आता सर्वाचे प्रश्न सोडविण्याचा व त्यांचे आदर्श पुनर्वसन करण्याचा प्रयत्न मी स्वत: करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
नरंेद्र पाटील म्हणाले, की माथाडी कामगार आमदार झाला आता शशिकांत शिंदेंच्या रूपाने मंत्री झाला. हा सर्वसामान्यावर नेतृत्वाने टाकलेला विश्वास आहे. आता मिळालेली पदे व अधिकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम साधले जाणार आहे. यावेळी विलासराव पाटील-वाठरकर यांचेही भाषण झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा