पाऊस समाधानकारक असला तरी मराठवाडय़ातील ८२२ प्रकल्पांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे. आजही मराठवाडय़ामध्ये ७२८ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुष्काळानंतर अजूनही बहुतांश प्रकल्पांतील पाणीसाठय़ात तशी वाढ झालेली नाही. जायकवाडीतही फारशी वाढ नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अजूनही पूर्णत: टळले नाही.
औरंगाबाद जिल्हय़ात पिण्याच्या पाण्यासाठी आजही ३८६ टँकर्स कार्यरत असून, खासगी विहीर अधिग्रहणाची संख्याही आजही ४६४ एवढी आहे. औरंगाबाद शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलाशयात वरच्या धरणातून काहीअंशाने पाणी सोडले जाईल, असे सांगितले जाते. तथापि, नगर आणि नाशिकमधील धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. काही धरणांच्या क्षेत्रात पडलेला पाऊस अधिक आहे. तेथे कालव्यांद्वारे पाणी सोडले आहे. त्यामुळे जायकवाडीत अजून म्हणावी तशी आवक नाही. दरम्यान, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. नांदेड जिल्हय़ातील निम्नमनार, विष्णुपुरी येथे मात्र मुबलक पाणीसाठा आहे. मध्यम व लघुपाटबंधाऱ्यातील फारसे पाणी वाढलेले नाही. मात्र, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हय़ात पडलेल्या पावसामुळे मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला आहे. ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये १३ टक्के तर ७९२ लघुप्रकल्पांमध्ये ११ टक्के पाणीसाठा आहे. आजही मराठवाडय़ातील मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे. औरंगाबाद जिल्हय़ात ३८६ टँकर, बीडमध्ये १८२ तर उस्मानाबादमध्ये १५३ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.