टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असून नाशिक जिल्ह्यातील तीन धरण कोरडीठाक पडली असताना आणखी आठ धरणे त्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह पालखेड व करंजवण, वालदेवी अशा काही धरणांमध्ये काही प्रमाणात जलसाठा शिल्लक आहे. तथापि, उन्हाच्या तडाख्यामुळे त्या पाण्याची बाष्पीभवन प्रक्रिया वेगात सुरू आहे.
दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नाशिकने मेच्या प्रारंभीच ४० अंशाचा टप्पा ओलांडून हंगामातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. महिनाभरापासून सातत्याने वर चढणाऱ्या तापमानाने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचा बाष्पीभवनावर झाला आहे. सध्या संपूर्ण धरणातील पाण्याची पातळी दररोज एक सेंटीमीटरने कमी होत आहे. महिनाभराचा विचार करता हे प्रमाण ३० सेंटीमीटर म्हणजे एक फूटहून अधिक होते, असा दाखला नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दिला. याचा विचार करता तापमानाचा फटका धरणातील जलसाठय़ाला कशा पद्धतीने बसत आहे ते सहजपणे लक्षात येईल.
नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील एकूण १७ धरणांची स्थिती लक्षात घेतल्यास मेच्या सुरूवातीला तीन धरण पूर्णपणे रिक्त झाली आहेत. इतर आठ धरणांतील जलसाठा १ ते १२ टक्क्यांवर आला आहे.
उष्णतेच्या लाटेत बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. तिसगाव, काश्यपी धरणांसह नांदूरमध्यमेश्वर बंधारा पूर्णपणे रिक्त आहे.
शुक्रवारी दारणा धरणात ३३३ दशलक्ष घनफूट (४.६३ टक्के), ओझरखेड १०४ (४.८९), वाघाड १०५ (४.२१), कडवा १६८ (८.९९), मुकणे १९९ (२.४४), भोजापूर ६ (१.६६), पुणे गाव १५ (२.४५) आणि गौतमी गोदावरी २२७ (१२.१४) इतकाच जलसाठा आहे. कोरडीठाक पडणाऱ्या धरणांच्या यादीत लवकरच त्यांचाही समावेश होऊ शकतो. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या २१७२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३८.५८ टक्के जलसाठा आहे. पालखेड धरणात ४०७ दशलक्ष घनफूट (५४.२७ टक्के), करंजवण ६८३ (१६.४३), आळंदी १३९ (१४.३३), वालदेवी ५१२ (४५.१८) आणि भावली धरणात २३४ दशलक्ष घनफूट म्हणजे १६.३२ टक्के जलसाठा आहे.

जळगावमध्ये काही भागात पारा ४६ अंशावर
उष्णतेच्या तडाख्यात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यातील मध्यप्रदेशला लागून असणाऱ्या सीमावर्ती भागात तापमानाने ४६ अंशांची पातळी गाठली आहे तर फैजपूर व भुसावळ तालुक्यात ४५ अंशांची नोंद झाली आहे. जळगावचे तापमान ४३ अंशावर गेले असून वाढत्या तापमानाने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. उष्णतेच्या तडाख्याने संपूर्ण शहर होरपळून निघत आहे. लग्न सराईचे दिवस असल्याने रणरणत्या उन्हाची पर्वा न करता नागरिक बाजारपेठेत गर्दी करत असल्याचे विपरित चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच तालुक्यात उष्माघात कक्षांची स्थापना केली असली तरी उन्हात काम करणाऱ्यांनी बचाव करण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरवर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या भुसावळमध्येही पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. जिल्ह्याच्या शेजारील म्हणजे मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूर येथे ४६.५ अंश तापमान नोंदविले गेले. त्याच्या झळा राज्यातील सीमावर्ती भागात सोसाव्या लागत आहे.

Story img Loader