टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असून नाशिक जिल्ह्यातील तीन धरण कोरडीठाक पडली असताना आणखी आठ धरणे त्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह पालखेड व करंजवण, वालदेवी अशा काही धरणांमध्ये काही प्रमाणात जलसाठा शिल्लक आहे. तथापि, उन्हाच्या तडाख्यामुळे त्या पाण्याची बाष्पीभवन प्रक्रिया वेगात सुरू आहे.
दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नाशिकने मेच्या प्रारंभीच ४० अंशाचा टप्पा ओलांडून हंगामातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. महिनाभरापासून सातत्याने वर चढणाऱ्या तापमानाने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचा बाष्पीभवनावर झाला आहे. सध्या संपूर्ण धरणातील पाण्याची पातळी दररोज एक सेंटीमीटरने कमी होत आहे. महिनाभराचा विचार करता हे प्रमाण ३० सेंटीमीटर म्हणजे एक फूटहून अधिक होते, असा दाखला नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दिला. याचा विचार करता तापमानाचा फटका धरणातील जलसाठय़ाला कशा पद्धतीने बसत आहे ते सहजपणे लक्षात येईल.
नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील एकूण १७ धरणांची स्थिती लक्षात घेतल्यास मेच्या सुरूवातीला तीन धरण पूर्णपणे रिक्त झाली आहेत. इतर आठ धरणांतील जलसाठा १ ते १२ टक्क्यांवर आला आहे.
उष्णतेच्या लाटेत बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. तिसगाव, काश्यपी धरणांसह नांदूरमध्यमेश्वर बंधारा पूर्णपणे रिक्त आहे.
शुक्रवारी दारणा धरणात ३३३ दशलक्ष घनफूट (४.६३ टक्के), ओझरखेड १०४ (४.८९), वाघाड १०५ (४.२१), कडवा १६८ (८.९९), मुकणे १९९ (२.४४), भोजापूर ६ (१.६६), पुणे गाव १५ (२.४५) आणि गौतमी गोदावरी २२७ (१२.१४) इतकाच जलसाठा आहे. कोरडीठाक पडणाऱ्या धरणांच्या यादीत लवकरच त्यांचाही समावेश होऊ शकतो. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या २१७२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३८.५८ टक्के जलसाठा आहे. पालखेड धरणात ४०७ दशलक्ष घनफूट (५४.२७ टक्के), करंजवण ६८३ (१६.४३), आळंदी १३९ (१४.३३), वालदेवी ५१२ (४५.१८) आणि भावली धरणात २३४ दशलक्ष घनफूट म्हणजे १६.३२ टक्के जलसाठा आहे.
वाढत्या बाष्पीभवनाचा जलसाठय़ावर विपरित परिणाम
टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असून नाशिक जिल्ह्यातील तीन धरण कोरडीठाक पडली असताना आणखी आठ धरणे त्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह पालखेड व करंजवण, वालदेवी अशा काही धरणांमध्ये काही प्रमाणात जलसाठा शिल्लक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-05-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam water level goes below due to extreme summer heat in nashik district