ठाणे येथील रामचंद्रनगर परिसरात गेल्या आठवडय़ात खचलेली ‘सूर्यदर्शन’ ही चार मजली अनधिकृत इमारत धोकादायत असल्याचा अहवाल इमारतीचे बांधकाम तपासणी करणाऱ्या तज्ज्ञ अभियंत्यांनी नुकताच दिला आहे. या अहवालानुसार, महापालिकेने आता ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी दिल्लीच्या विशेष पथकाची मदत घेतली आहे. या पथकाने इमारतीच्या परिसराची पाहाणी करून ती कशा पद्धतीने जमीनदोस्त करावी, याविषयी महापालिकेला आराखडा तयार करून दिला आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून महापालिका ही इमारत पाडण्याची कारवाई सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, या कारवाईसाठी ३६० डिग्रीमध्ये (चौहोबाजूनी) वळणारी विशिष्ट क्रेन मागविण्यात आली असून अशा स्वरूपाची क्रेन पहिल्यांदाच ठाण्यात  आणण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
ठाणे येथील नितीन कंपनीजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरच १९ वर्षांपुर्वी उभारण्यात आलेली ‘सुर्यदर्शन’ ही अनधिकृत इमारत गेल्या शनिवारी खचली. त्यामुळे या इमारतीतील दोन विंगमध्ये राहणाऱ्या ३४ कुटुंबांना महापालिकेच्या आपत्ती विभागाने इमारतीबाहेर काढले होते. तसेच ही इमारत रहिवाशी वापरासाठी योग्य आहे का, यासंबंधीची तपासणी तज्ज्ञ अभियंत्याकडून करण्यात आली होती. दरम्यान, इमारत बांधकाम तपासणीचा अहवाल तज्ज्ञ अभियंत्यांनी महापालिकेस नुकताच दिला आहे. ही इमारत धोकादायक असल्याने रहिवाशी वापरासाठी योग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच या इमारतीमधील ३४ कुटूंबांना वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरांमध्ये स्थलांतरीत केले आहे. या इमारतीला खेटूनच तिजादीप तसेच अन्य इमारती आहेत. त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करताना आसपासच्या इमारतींना धोका पोहचू नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच पाश्र्वभूमीवर महापालिकेने दिल्लीतील एका विशेष पथकाची मदत घेतली असून या पथकाने बुधवारी सूर्यदर्शन इमारत परिसराची पाहाणी केली आहे. तसेच इमारत कशा पद्धतीने जमीनदोस्त करावी, यासंबंधी मार्गदर्शन करून त्याचा आराखडा तयार करून दिला आहे. त्यानुसार, महापालिकेने ही इमारत पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या इमारतीमधील काही रहिवाशांनी यापुर्वीच घरातील साहित्य इमारतीबाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी हलविले होते. तर काही रहिवाशांनी घरातील साहित्य काढले नव्हते. मात्र, इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे कळताच बुधवारी या रहिवाशांनी घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरूवात केली. त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मदत करताना दिसून आले. विशेष म्हणजे, ‘ए’ विंगमधील रहिवाशांचे साहित्य इमारतीबाहेर काढण्यात येत होते. तर ‘बी’ विंगजवळ इमारत खचली असल्याने तेथील रहिवाशांचे साहित्य काढण्यात आले नव्हते. तेथील रहिवाशांचे साहित्य टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असल्याचे महापालिका सुत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा