मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षासह पंधराजणांवर गुन्हा
राष्ट्रवादी व मनसे कार्यालयास पोलीस बंदोबस्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीच्या ताफ्यावर अहमदनगर येथे दगडफेक केल्याच्या प्रकरणाचे पडसाद पुण्यातही उमटले असून, मंगळवारी मध्यरात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष साबळे यांच्यासह दहा ते पंधराजणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी मध्यरात्री मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवार पेठेतील गिरे बंगला येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. कार्यालयावर पेट्रोलचे बोळे टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कार्यालयाच्या आवारातील फुलांच्या कुंडय़ा फोडून नुकसान केले. या घटनेनंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शहरातील इतर विभागीय कार्यालयाला बंदोबस्त ठेवण्यात आला. या तोडफोड प्रकरणी जितेंद्र सुधाकर टकले (वय ४६, रा. नवी पेठ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
तोडफोडीनंतर बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शनिपार येथे अडविले. त्यामुळे त्याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभा घेऊन पक्षाच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा निषेध केला.  
याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले की, शहरातील मनसे व राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या तसेच शहरात गटाने फिरण्यास मनाई करण्यात आली असून फिरताना आढळून आल्यास त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात टायर जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा