सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होऊन दहा मिनिटेही उलटत नाहीत, तोच पक्षांतर्गत गटबाजी तथा गुंडगिरी व झुंडशाहीतून हे संपर्क कार्यालय फोडण्यात आले. लष्कर भागात शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पक्षश्रेष्ठी अवाक झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांना आणखी एक वर्षांचा कालावधी असताना या निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लष्कर भागातील श्रीराम बेकरीजवळ त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले होते. या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शनिवारी सायंकाळी आयोजिला होता. या वेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया तसेच शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तौफिक शेख यांना निमंत्रित करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे आमदार शिंदे व अ‍ॅड. बेरिया हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. तौफिक शेख हे न आल्यामुळे आमदार शिंदे व अ‍ॅड. बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीतच संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उरकण्यात आले. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच तौफिक शेख यांच्या १५-१२ गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांनी तेथे येऊन धुडगूस घातला. या टोळक्याने संपर्क कार्यालयात घुसून मोडतोड केली. यात कार्यालयातील काचांसह  फर्निचरचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची नोंद पोलिसांकडे झाली नाही. सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांनी या संदर्भात कोणीही तक्रार द्यायला आले नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनीही या संपर्क कार्यालयाशी आपला संबंध नसून, कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून उद्घाटन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर बेरिया व तौफिक शेख यांच्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे आपणास समजल्याचे स्पष्ट केले. तौफिक शेख हे ‘बाहुबली’ असून माजी महापौर आरीफ शेख यांचे ते बंधू आहेत. यापूर्वी एकदा आमदार प्रणिती शिंदे यांनी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर क्रिकेट सामने भरवले असता दोन गटांत हाणामारी होऊन त्या वेळी काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या भावाने प्रणिती शिंदे यांच्यासमोर हातात चाकू घेऊन धुडगूस घातला होता. त्यानंतर आता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होऊन दहा मिनिटेही होत नाहीत, तोच गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हे संपर्क कार्यालय फोडल्याने पक्षांतर्गत गुंडगिरी व झुंडशाहीने तोंड वर काढल्याचे दिसून येते.

Story img Loader