एक एरिअल रिंग आणि त्यात स्वत:ला अडकवून घेत वेगवेगळ्या पद्धतीने साकारला जाणारा नृत्याविष्कार. मध्येच त्यात उठणारा अग्निकल्लोळ आणि त्यातूनही नाचत बाहेर पडणारा नर्तक. स्टंट आणि नृत्याची सांगड असलेला अनोखा नृत्याविष्कार ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवरील ‘सुवर्णयुगाचा जल्लोष’ या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने नृत्यात माहीर असणारे मराठी कलाकार पहिल्यांदाच स्टेजवर स्टंट्स करताना दिसणार आहेत.
‘सुवर्णयुगाचा जल्लोष’मध्ये पूजा सावंत, अभिजित केळकर, अमित भानुशाली, हरिश दुधाडे असे नावाजलेले मराठी कलाकार स्पर्धक म्हणून आपले कौशल्य पणाला लावताना दिसणार आहेत.
या शोसाठी सुधा चंद्रन आणि नितीश भारद्वाज परीक्षक म्हणून काम पाहात आहेत, तर ज्येष्ठ अभिनेता रमेश देव हे ‘पितामह’ म्हणून या नृत्याविष्कारांना पारखणार आहेत. स्टंट्स आणि नृत्याचा मिलाफ साधणे हे आमच्यासाठी खूप मोठे आव्हान होते, कारण असा प्रकार आम्ही कधीच केला नव्हता, असे या स्पर्धकांचे म्हणणे आहे.
‘मी माझ्या नृत्यदिग्दर्शकांवर संपूर्ण विश्वास टाकून काम करीत आहे, बाकी सगळे देवावर सोडले आहे’, असे एका एरिअल रिंगवर आपले शरीर तोलून धरत नृत्य करणाऱ्या पूजाने सांगितले, तर अभिजित केळकरसाठी हे लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. ‘हे स्टंट करायला अवघड आहेत, पण या स्टंटमुळे माझी लहानपणी असलेली उडण्याची इच्छा पूर्ण झाली’, असे अभिजितने सांगितले.
मराठी मालिकांमधून घरोघरी परिचित झालेल्या अमित भानुशालीने तर आपल्या नृत्यामध्ये एरिअल रिंगबरोबर आगीचा थरारही अनुभवला आहे. स्टंट आणि नृत्याचा मिलाफ साधणारा हा स्पर्धकांचा जल्लोष या शोला वेगळेपणा देणारा ठरला आहे.     

Story img Loader