डान्स बार पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर डान्स आणि ऑर्केस्ट्रा बार पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी जोरदार कारवाई सुरू झाली आहे. स्थानिक पोलीस या बारकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे गृहमंत्रालयानेच हस्तक्षेप करून मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बारमालकांचे धाबे दणाणले आहेत.
मध्यंतरी मुंबईतील पोलिसांनी ठाण्यातील तर ठाण्यातील पोलिसांनी नवी मुंबईतील बारवर कारवाई करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणी थेट गृहमंत्र्यांचेच आदेश असल्याचे सांगितले जात होते. नववर्षांनिमित्त पुन्हा डान्स बार जोरात सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेवर याबाबत अधिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाणे वा नवी मुंबईतील डान्सबारबाबत माहिती काढण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. तशाच सूचना ठाणे व नवी मुंबईतील पोलिसांनाही देण्यात आल्या आहेत. डान्स बार सुरु आढळल्यास थेट वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई होत असल्यामुळे पोलिसांनीही या बारभोवती पाश आवळले आहेत.

Story img Loader