चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त नृत्यगुरू आचार्य पार्वतीकुमार यांचे शास्त्रीय नृत्यासाठीचे जागतिक स्तरावरील योगदान मोठे आहे. आपल्या या गुरूचे यथोचित स्मरण करता यावे म्हणून त्यांच्या ९५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या शिष्या डॉ. संध्या पुरेचा यांनी ‘नृत्यावंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन जयंतीदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ७.३० वाजता केले आहे.
आचार्य पार्वतीकुमार यांनी भरतनाटय़म या नृत्यशैलीविषयी केलेले संशोधन, त्याचा पुन:प्रत्यय या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून १९ फेब्रुवारीला मिनी थिएटरमध्येच ‘गती महोत्सव’ होणार आहे. शास्त्रीय नृत्यांत योगदान देणाऱ्या युवा नृत्यांगनांचे नृत्याविष्कार यात पाहायला मिळतील. कथ्थक नृत्यांगना आशा जोगळेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी ‘पंचम महोत्सव’ही होणार आहे. डॉ. संध्या पुरेचा, आशा जोगळेकर, चेतन सरैया, आशा नम्बियार हे नृत्यगुरू आणि त्यांचे शिष्यवृंद मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर, शंकरशेट शिव मंदिर, गोकुळधाम मंदिर, साईधाम मंदिर, जीवदानी देवी मंदिर अशा पाच मंदिरांमध्ये जाऊन तिथे नृत्याविष्कार सादर करणार आहेत.