सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास कुणी करायचा यावरून नवी मुंबईतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अक्षरश: धूमशान सुरू असताना शहरातील काही नवरात्रोत्सव मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून या इमारतींचे धोकादायक वास्तव ठसठशीतपणे मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाशी सेक्टर नऊ येथील संभाजी मैदानात चालणाऱ्या भल्या मोठय़ा गरबा उत्सवात या भागातील धोकादायक इमारतींची माहिती देणारे मोठाले फलक उभारण्यात आले असून याच परिसरातील आणखी काही मंडळांनीही हा प्रश्न पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नवी मुंबईत सिडकोसारख्या शासकीय संस्थेने उभारलेल्या शेकडो इमारती धोकादायक बनल्या असून वाशी सेक्टर नऊ परिसरातील जे. एन. टाइप वसाहतीमध्ये अशा इमारतींच्या अक्षरश: रांगा दिसून येतात. या इमारतींच्या पुनर्विकासाठी नवी मुंबई महापालिकेने र्सवकष असा एक प्रस्ताव तयार केला असून यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचे प्राक्तन मुंबई, ठाण्यातील इमारतींपेक्षा वेगळे आहे. सिडकोसारख्या शासकीय संस्थांनी या इमारतींची उभारणी केली असून धोकादायक म्हणून गणली जाणारी एकही इमारत बेकायदा नाही. त्यामुळे या इमारतीचे पुनर्विकास धोरण मंजूर करण्यात कायदेशीर अडचणी फारशा नाहीत. तरीही जमीन आमची असल्याने या इमारतींचा पुनर्विकास सिडकोमार्फत केला जावा, अशी मेख मारत सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूुराव यांनी या प्रकरणी महापालिकेच्या धोरणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुनर्विकास धोरण नेमके कोण राबविणार या कात्रीत सध्या या इमारती सापडल्या आहेत.
रहिवासी संतापले
सिडको अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे वाशी सेक्टर ९, १०, १५, १६ यांसारख्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून हा संताप व्यक्त करण्यासाठी नवरात्रोत्सवाचे व्यासपीठ निवडले जात असल्याचे चित्र या उपनगरात दिसत आहे. वाशी सेक्टर नऊ परिसरात धोकादायक इमारतींची संख्या मोठी आहे. या ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांनी या इमारतींची अवस्था दाखविणारे भले मोठे होर्डिग्ज या भागात उभारले असून गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या रांगा ही छायाचित्र पाहण्यासाठी लागत आहेत. ठाणे, मुंब्रा, डॉकयॉर्ड रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा घटनाक्रम उलगडताना नवी मुंबईची वाट पाहात आहात का, असा सवाल विचारणारे फलक या उत्सवाभोवती लावण्यात आले आहेत. वाशी सेक्टर १६ परिसरात प्रगती मित्र मंडळातर्फे साजऱ्या होणाऱ्या उत्सवातही या प्रश्नाची भीषणता दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. जे. एन. टाइप परिसरातील शेकडो इमारती धोकादायक बनल्या असून या इमारतींचा पुनर्विकास कुणी करायचा यावरून नाहक वाद निर्माण केले जात आहेत. त्यामुळे यासंबंधीची वस्तुस्थिती शासकीय यंत्रणांना कळावी यासाठी उत्सवाच्या माध्यमातून हा फलकप्रपंच करण्यात आला आहे, अशी माहिती वाशी सेक्टर नऊ येथील नवरात्रोत्सवाचे अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांनी वृत्तान्तला दिली. महापालिकेने यासंबंधीचे पुनर्विकास धोरण सरकारकडे पाठविले आहे. त्यावर लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांचे डोळे उघडावेत, असा आमचा प्रयत्न आहे, असे वाशी सेक्टर १६ चे नगरसेवक राजू िशदे यांनी सांगितले.
वाशीतील धोकादायक वास्तवाला उत्सवाची साथ
सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास कुणी करायचा यावरून नवी मुंबईतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अक्षरश: धूमशान सुरू असताना
First published on: 12-10-2013 at 08:25 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous buildings truth shown by festivals