‘बर्म्युडा ट्रँगल’ हा समुद्रातील विशिष्ट टापू जगभरातील साहसवीरांना भुरळ घालत आला आहे. या विशिष्ट पट्टय़ात समुद्रमार्गे किंवा आकाशमार्गे प्रवेश करणारी कोणतीही वस्तू आपोआप खेचली जाते आणि नाहीशी होते, अशी वदंता आहे. या रहस्यावर बेतलेले काही चित्रपट हॉलीवूडमध्ये प्रदर्शितही झाले आहेत. आता अशाच एका कल्पनेवर आधारित मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर येत आहे. ‘वेलकम टू जंगल’ हे या चित्रपटाचे नाव असून तो मराठीतील पहिला साहस विज्ञान कथेवर आधारित चित्रपट असल्याचे निर्मात्याचे म्हणणे आहे.
जंगलातल्या एका विशिष्ट भागात गेलेली व्यक्ती परत येत नाही, असे अनुभव अनेकदा येतात आणि मग त्याचा शोध घेण्यासाठी काही लोक त्या जंगलात जातात, असे या चित्रपटाचे ढोबळ कथानक आहे. या चित्रपटात ग्राफिक्स, व्ही एफ कस, क्रोमा तंत्रज्ञानाचा सढळ वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले असून ‘संभा आजचा छावा’मध्ये मुख्य भूमिका केलेला देवेंद्र आणि दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण आंबा, विशाळगड, कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ, रंकाळा परिसर या ठिकाणी झाले आहे. तसेच सलग ३० तास चित्रीकरण करण्याचा आगळावेगळा विक्रमही या चित्रपटाच्या निमित्ताने झाला आहे. गुरुमाऊली क्रिएशन्स निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daring science story based movie now in marathi