सिडकोच्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड या औद्योगिक परिसरातील पथदिवे मागील आठवडाभरापासून बंद असल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता वर्तविली जात आहे. द्रोणागिरी परिसरातील पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी या परिसरातील वाहनचालक तसेच नागरिकांकडून केली जात आहे.
सिडकोने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोड परिसरात मोठय़ा प्रमाणात जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योग आहेत. यामध्ये बंदरातून येणाऱ्या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामांची संख्या मोठी असून या गोदामातील मालाची ने-आण करण्यासाठी अवजड वाहने या मार्गाने ये-जा करीत आहेत. जेएनपीटी ते पागोटे तसेच पागोटे ते खोपटा दरम्यानच्या सात-आठ किलोमीटरच्या रस्त्यावर सिडकोने पथदिवे बसविलेले आहेत. त्यामुळे या विभागातील भेंडखळ, नवघर, पागोटे, कुंडेगाव आदी परिसरांतील नागरिकांनाही याचा लाभ होत आहे.
उरण-पनवेल रस्त्यालगत असलेल्या नवघर येथील वीर वाजेकर उड्डाण पुलावरील विजेचे दिवेही बंद असल्याने या परिसरातही अंधार पसरला आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांची रहदारी असलेल्या या उड्डाण पुलावरील पथदिवे सुरू करण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा