महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवर प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या गावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात येत्या  ६ जानेवारी २०१३ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धिपत्रकाने दिली आहे.
८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार धनंजय दातार व साहित्यिक माधव राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. या समारंभात सन २०१२ च्या प्रतिष्ठेच्या २० व्या दर्पण पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यामध्ये ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्काराने’ बहाद्दरपुरा (ता. कंधार, जि. नांदेड) येथील साप्ताहिक जय क्रांतीचे संपादक डॉ. केशव शंकर धोंडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दर्पण पुरस्काराने पुणे विभाग-मुकुंद फडके  (निवासी संपादक-दै. सकाळ, जिल्हा आवृत्ती), कोकण विभाग – संजय चंद्रकांत पितळे (प्रतिनिधी-दै. पुण्यनगरी, ठाणे, जि. ठाणे), नाशिक विभाग-नंदकुमार सोनार (संपादक-दै. सार्वमत, श्रीरामपूर, जि. अहमदनगर), अमरावती विभाग – अरविंद तुकाराम गाभणे (प्रतिनिधी-दै. लोकमत, मालेगाव, जि. वाशिम), नागपूर विभाग-महेश घन:शाम तिवारी (प्रतिनिधी-ई टीव्ही., गडचिरोली), औरंगाबाद विभाग -योगेश सुरेशराव पाटील (प्रतिनिधी-दै. सामना, हिंगोली), बृहन्महाराष्ट्र विभाग-मनोहर कालकुंद्रीकर (संपादक-दै. रणझुंजार, बेळगाव) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सातारा येथील बाळासाहेब आंबेकर, पाटण येथील इलाही मोमीन या ज्येष्ठ पत्रकारांना विशेष दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार साहित्यिकांपैकी एका उत्कृष्ट साहित्यिकाला देण्यात येणारा यशवंत पाध्ये पुरस्कृत ‘दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्कार’ राजापूर जि. रत्नागिरी येथील वृषाली आठले यांना तर संस्थेच्या वतीने राज्यातील एका महिला पत्रकाराला देण्यात येणारा ‘महिला दर्पण पुरस्कार’ ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या अलका धुपकर यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
तरी मराठी वृत्तपत्रसृष्टीतील या महत्त्वपूर्ण समारंभासाठी पत्रकार, साहित्यिक, वृत्तपत्र व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर परिवाराने केले असल्याचे विजय मांडके यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.  

Story img Loader