मराठा विकास संघटना व मारुती फौंडेशनच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी इचलकरंजी येथे दसरा महोत्सवाचे आयोजन केले आहे. पारंपरिक मिरवणूक, आतषबाजी, लोककला, मर्दानी खेळ, गणराया पुरस्कार वितरण यांसह अनेक कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, अशी माहिती महोत्सवाचे मानकरी सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इचलकरंजीचे अधिपती नारायणराव घोरपडे यांनी संस्थान काळात दसरा महोत्सवाचे आयोजन केले होते. पाच वर्षांपूर्वी त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यंदाही तो पूर्वीच्याच उत्साहात साजरा केला जाणार आहे. दसऱ्या दिवशी दुपारी अंबाबाई मंदिरापासून मिरवणूक निघणार आहे. यामध्ये शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, भालदार, चोपदार, गोंधळी, शाहीर, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, उंट, अश्व, ढोल व ताशा वादाकांचा संच यांसह पारंपरिक वाद्यांचा गजर घुमणार आहे. शहराचा जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे.
अंबाबाई मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक राजवाडा येथे जाऊन ग्रामदैवत व आबासाहेब घोरपडे यांचा आशीर्वाद घेऊन गांधी पुतळा येथे जाईल. तेथे नवचंडिकेचे पूजन व कोहळा फोडण्याचा विधी पार पडेल. नाटय़गृह चौकात मुख्य कार्यक्रम होणार असून तेथे गणराया पुरस्कार व दुर्गामाता पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी खासदार जयवंतराव आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, डॉ. संजय पाटील, नगराध्यक्षा सौ. सुमन पोवार, उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मोहन माने, अमरजित जाधव, हारुण पानारी, आनंदा माने, मधुकर पाटील, संतोष कांदेकर आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा