राहत्या घरात आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृश्य पाहिल्यानंतर तिच्या १२ वर्षांच्या वैफल्यग्रस्त मुलीनेही स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे घडली.
संगीता मल्लिनाथ भिसे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने आत्महत्या केल्याचे पाहताच तिची मुलगी साक्षी हिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यातूनच तिने घरातच स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. बहिणीने पेटवून घेतल्याचे दिसताच तिचा धाकटा भाऊ आदित्य (वय ८) याने तिच्या शरीरावर पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी साक्षी ही भाजून जखमी झाली असून तिला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती मृत्युशय्येवर आहे. तिची आई मृत संगीता ही आपल्या पतीपासून विभक्त होऊन गावातच दोन्ही अपत्यांसह स्वतंत्रपणे राहात असे. परंतु घरसंसार चालवताना होणारी ओढाताण असहय़ झाल्याने तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला. याप्रकरणी वळसंग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader