आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २३वे दक्षिण महाराष्ट्र संमेलन येत्या रविवारी (दि. २०) कराड येथे होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली असून, ज्येष्ठ नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह गोविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे उपस्थित होते.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे २५ ते १९८२ रोजी कोल्हापुरात झाली. आतापर्यंत संस्थेची २२ संमेलने झाली असून, २३वे संमेलन कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात घेण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता सुरू होईल. आमदार विलासराव पाटील, नगराध्यक्ष प्रा. उमा हिंगमिरे, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, अविनाश मोहिते, शंभूराज देसाई, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभामध्ये साहित्यिक आनंद विंगकर व ज्येष्ठ तबलावादक रमाकांत देवळेकर (दोघेही कराड), ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते पंढरीनाथ शेवाळे (इस्लामपूर) आणि ज्येष्ठ लोककलावंत यशवंत भाऊ सूर्यवंशी (काळमवाडी) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर लगेचच दुपारी साडेबारा वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून, कादंबरीकार राजन खान मुलाखत घेणार आहेत. मुलाखतीचा हा कार्यक्रम नेहमीच्या मुलाखतींसारखा नसेल, तर मराठीतील एका प्रमुख साहित्यिकाला त्यांच्याच पिढीतील दुसरा कादंबरीकार बोलते करणार आहे. दुपारी अडीच वाजता मान्यवरांचे कविसंमेलन होणार आहे. त्यामध्ये प्रा. विठ्ठल वाघ (पुणे), अशोक नायगावकर (मुंबई), राम गोसावी (मिरज), प्रा. शोभा रोकडे (अमरावती) आणि सुरेश मोहिते (इस्लामपूर) हे कविता सादर करतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता ‘यशवंतरावांनंतरचा महाराष्ट्र’ या विषयावरील परिसंवाद होईल. त्यामध्ये माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्राचार्य विश्वास सायनाकर, वारणा उद्योग समूहाचे प्रमुख विनय कोरे आणि ख्यातनाम साहित्यिक-समीक्षक डॉ. आनंद पाटील सहभागी होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा