हॅलो, गोरेगाव पूर्वेला पूर्णिमा इमारत कोसळली आहे..ताबडतोब बंब पाठवा.. रुग्णवाहिका पाठवा.. रुग्णालयांना अॅलर्ट द्या.. ढिगारे उपसण्यासाठी जेसीबीची गरज.. मोठी जीवितहानी झाल्याची भीती.. पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी पाठवा.. आयुक्तांना तसेच सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच विभाग अधिकाऱ्यांना कळवले आहे.. सर.. प्रभाग नियंत्रण कक्ष, अग्निशमन, रुग्णालय, पोलीस, सामाजिक संस्था, स्थानिक नगरसेवक व आमदार यांना इमारत कोसळल्याची माहिती दिली आहे.. सर अत्यावश्यक यंत्रणांना हॉटलाइनवरून तीन मिनिटांत संपर्क केला.. सर फॉलोअप सुरू आहे.. रुग्णालयांमध्ये सर्जन आणि रक्ताची व्यवस्था करायला सांगितले आहे..
बुधवारी १२.३० वाजता गोरेगावमध्ये इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांमध्ये मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांनी अपघाताशी संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून घटनास्थळी जाण्यास सांगितलेदेखील.. प्रत्यक्षात ही रंगीत तालीम होती..
मुख्यालयाच्या तळघरातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना कोणत्या घटनेला कशा प्रकारे सामोरे जायचे याची पक्की माहिती आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे निश्चित अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्याच्या क्षणापासून सेफ्टी ऑफिसर, लॉजिस्टिक ऑफिसर, रिपोर्टिग ऑफिसर आपापले काम इमानेइतबारे करीत होता. पालिकेच्या २४ प्रभागांसाठी २४ हॉटलाइन आणि लष्कर, अग्निशमन, रुग्णालय, पोलीस, रेल्वेसह सर्व प्रमुख यंत्रणांसाठी २१ हॉटलाइन्स सीसीटीव्ही, हवामान केंद्र, १०८ आणि १९१६ या क्रमांकावर आदळणाऱ्या माहितीला सामोरे जाण्याचे काम ३६ कर्मचारी अहोरात्र करत असतात. सर्व अत्यावश्यक यंत्रणांना व वरिष्ठांना इमारत कोसळल्याची माहिती दिल्यानंतर पुन्हा घटनास्थळी पोहोचलेल्या विभाग अधिकाऱ्यांच्या पथकाकडून परिस्थिती समजून घेऊन पुढच्या दहा मिनिटांत आपत्कालीन मदत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये आवश्यकतेनुसार मुंबईतील १४ यंत्रणांपैकी ज्यांची गरज असते अशा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले जाते. यात पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन, रुग्णालयांचे प्रतिनिधींना नियंत्रण कक्षमध्ये बोलवले जाते.
गोरगावचा कॉल सुरू असतानाच आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर ही यंत्रणा कशी काम करते ते समजावून सांगत होते. विभागाचे सर्वात मुख्य काम म्हणजे दुर्घटनेची माहिती मिळताच पहिल्या तीन मिनिटांमध्ये सर्व संबंधित यंत्रणांना सावध करणे. त्यानंतर यंत्रणांच्या कामाला गती देण्यापासून ते योग्य रीतीने होत आहे की नाही हे पाहणे. या विभागातील अधिकारी संगीता लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार, १०८ क्रमांकावर एका पाळीत किमान १५० दूरध्वनी येतात. पावसाळ्यात ते २५० वर जाते. १९१६ वरही एका पाळीत तक्रारींचे दीडशे फोन येत असतात. झाड पडले, रस्त्यावर खड्डे पडले, मांजर अडकले, अनधिकृत बांधकाम सुरू आहे इथपासून ते पालिकेला दूषणे देणारे दूरध्वनी येथील कर्मचारी न कंटाळता घेत असतात. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक वॉर्डात दोन वेळा रंगीत तालीम घेतली जाते, प्रत्येक पाळीत हॉटलाइनच्या प्रतिसादाची तपासणी केली जाते. कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास नेमके काय करायचे याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यामुळे पावसाळ्यातील दुर्घटना, ट्रेन बंद होणे, बॉम्बस्फोट, वाहतुकीची कोंडी तसेच भूकंपासारखी घटना घडल्यास त्याला . तोंड देण्यास आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. यंत्रणेला गती देण्याचे तसेच अधिकाधिक अत्याधुिनक बनविण्याचे काम अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर व आयुक्त सीताराम कुंटे यांनी केल्यामुळेच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याचेही नार्वेकर यांनी अभिमानाने सांगितले.
‘मॉक ड्रिल’चा आँखो देखा हाल..
पावसाळा सुरू झाला आणि अपेक्षेपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होऊ लागली की, पालिकेच्या सुसज्ज आपत्कालीन विभागाची सर्वानाच आठवण येते, परंतु हा विभाग वर्षांचे बारा महिने रात्रंदिवस कार्यरत असतो. अधूनमधून रंगीत तालीम घेऊन या यंत्रणेची सुसज्जता तपासली जाते. अशाच एका तालमीचा हा आँखो देखा हाल..