पारनेर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तुळशिराम कांडेकर यांच्यावर काल (बुधवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास काळकूप शिवारात प्राणघातक हल्ला झाला. कांडेकर यांना धारदार गुप्तीने भोकसण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या पोटावर जखम झाली असून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले आहे.
सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज आटोपून कांडेकर मोटारसायकलने घरी हमीदपूर (ता. नगर) निघाले होते. पारनेर शिवारात राहणाऱ्या अदिनाथ औटी यांनाही त्यांनी सोबत घेतले. त्यांना त्यांच्या वस्तीवर सोडून ते पुढे जाणार होते. पारनेर शहर सोडल्यानंतर एक जीप पाळतीवर असल्याचे कांडेकर यांच्या लक्षात आले.
जामगाव ओलांडल्यानंतर लाल रंगाची आल्टो कार त्यांचा पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाळवणी जवळ काळकूप शिवारात आल्यावर मागून येणाऱ्या आल्टोने कांडेकर यांच्या मोटारसायकलला रस्त्याच्या खाली दाबून थांबण्यास भाग पाडले. कांडेकर थांबल्यानंतर आल्टोतील तिघांनी खाली उतरून कांडेकर यांच्यावर हल्ला केला. दोघांनी लाकडी दांडक्याने तर एकाने धारदार गुप्तीने मारहाण केली. गुप्तीने कांडेकर यांना भोकसण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यांच्या पोटास जखम झाली तर दांडक्याच्या मारहाणीत त्यांच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले आहे. मारहाण सुरू असताना भाळवणीकडून दोन वाहने आल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
कांडेकर यांनी नंतर दूरध्वनीद्वारे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन अडसूळ व अभय औटी यांना त्याबाबत कल्पना दिली. अडसूळ व औटी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कांडेकर यांना ते पुन्हा पारनेर येथे घेऊन आले. त्यांना येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रूग्णालयात जाऊन कांडेकर यांचा जबाब नोंदविला. हल्ल्याचे वृत्त समजल्यावर युवक नेते अनिकेत औटी, माजी सरपंच राजेंद्र तारडे, विजय डोळ, साहेबराव देशमाने, संदीप मोढवे,बबन शेख यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी रूग्णलयात धाव घेऊन त्यांच्या प्रक्रतीची विचारपूस केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा