कर्णबधिर व्यक्तींनी दूरध्वनीवर संवाद साधणे ही वर-वर अशक्यच वाटणारी गोष्ट! परंतु योग्य प्रशिक्षणाद्वारे तेही शक्य आहे. घरच्या घरी कर्णबधिर बालकांना आवाज व शब्द ओळखायला कसे शिकवावे, त्यांना वाचा-भाषा प्रशिक्षण कसे द्यावे आणि दूरध्वनीवर बोलायला कसे शिकवावे, याविषयी या बालकांच्या पालकांना प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणातील रुईया मूकबधिर विद्यालयात २५ ते २७ जानेवारीदरम्यान दुपारी बारा ते सायंकाळी सहा या वेळात ही कार्यशाळा होणार आहे. अरविंद मंडलिक या कार्यशाळेचे नेतृत्व करीत आहेत. मंडलिक स्वत: पूर्णत: कर्णबधिर आहेत. ते दूरध्वनीवर उत्तमरीत्या बोलू शकतात. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९२२०७२५६७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडलिक यांनी केले आहे. कर्णबधिर मुलांना नेमका कोणता त्रास असतो, त्यांना समाजात मिसळताना कोणत्या अडचणी येतात, मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील असे विषय या कार्यशाळेत चर्चिले जाणार आहेत.