विक्रीसाठी कराडात आणलेल्या ७ पोती गुटख्याची चोरी करण्याचा कट हा या गुटख्याची खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या व्यापाऱ्यानेच रचला होता, असे शहर पोलिसांच्या तपासातून निष्पन्न होत आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी सदर व्यापाऱ्यासह त्याला मदत करणाऱ्या आणखी एकास अटक केली. झाकीर इनायतुल्ला पटेल (रा. पाटण कॉलनी, कराड) हाच गुटखा लुटीचा मास्टरमाइंडचे असून, त्याला मदत करणारा अब्दुल ऊर्फ दगडू दस्तगीर मुजावर (रा. अजंठा ट्रान्सपोर्ट, शनिवार पेठ, कराड) अशा दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या दोघांकडून या गुन्ह्यातील चोरीची ३ लाख ३७ हजार ६०० रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, कराड व्यतिरिक्त अन्यत्र गुटख्याचा पुरवठा झाला का आणि एकंदर गुटखा विक्रीची उलाढाल किती असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील व्यापारी झाकीर इनायतुल्ला पटेल (रा. पाटण कॉलनी, कराड) याने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील अतुल अनिल नाईक यांच्याकडे गोवा गुटखा या कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असताना त्याची झाकीर पटेल याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीमुळे झाकीर पटेल याने नाईक याला जादा कमिशन देऊन गुटखा देऊ असे सांगितल्याने नाईक याने दिल्ली येथून कुरियरने गोवा गुटख्याच्या ४२ बॅगा ७ पोती मागविल्या होत्या. त्या बॅगा इचलकरंजी येथे मिळाल्यानंतर त्याने त्याच्या ओळखीच्या एकाच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीतून त्या कराडल्या आणल्या. मात्र, कराडकडे त्या येत असताना कराडनजीकच्या कोल्हापूर नाका येथे चौघांनी पोलीस असल्याचा बहाणा करून गाडी अडवून गाडीतील नाईकसह इतरांना बेदम मारहाण केली. त्यांना गाडीतून खाली उतरवून गाडी घेऊन पसार झाले. या गाडीतील गुटख्याच्या ४२ बॅगा व ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे ठेवलेली ३ लाख ३७ हजार ६०० रुपयांची रोख रक्कमही चोरटय़ांनी लुटली. चोरीनंतर चोरटय़ांनी गाडी मलकापूर येथील गंधर्व हॉटेलजवळ सोडून दिली. याप्रकरणी अतुल नाईक याने फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या चोरीचा छडा लावून नरेश गुप्ता (वय २२, रा. बनवडी) मज्जीद खतीब (वय ४३), फिरोज शेख (वय ३६), सोमनाथ सूर्यवंशी (वय २२, तिघे रा. ओगलेवाडी) या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून चोरीचा गुटखा, टेम्पो ट्रॅव्हलर गाडी, महिंद्रा बोलेरो जीप व मोबाइलमधील चार बॅटऱ्या असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
संशयितांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाला गती देण्यात आली. गुटख्याचा माल खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्यानेच गुटखा चोरण्याचा कट रचल्याने तपासात समोर आले. गुटखा चोरी करणाऱ्या चौघांनी हे कृत्य झाकीर पटेल यांच्याच सांगण्यावरून केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी झाकीर पटेल याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अब्दुल मुजावर यालाही अटक केली. या दोघांकडून गुन्ह्यातील चोरीची ३ लाख ३७ हजार ६०० हजारांची रोकडही हस्तगत करून जप्त केली. अतुल नाईक याने सदरचा गोवा गुटख्याचा माल हा दिल्ली येथून कुरियरने मागविला होता असेही पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
कराडचा व्यापारीच लाखोंच्या गुटखा लुटीचा मास्टरमाइंड!
विक्रीसाठी कराडात आणलेल्या ७ पोती गुटख्याची चोरी करण्याचा कट हा या गुटख्याची खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या व्यापाऱ्यानेच रचला होता, असे शहर पोलिसांच्या तपासातून निष्पन्न होत आहे.
First published on: 11-08-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dealer of karad mastermind in lakhs of gutkha loot