लोहा व कंधार तालुके दुष्काळाने होरपळून निघत असताना पिण्याचे पाणी भरण्यास गेलेल्या दोघींचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. लोहा तालुक्यातल्या किवळा येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. नांदेड जिल्ह्य़ातील लोहा, कंधार, नायगाव तालुक्यातल्या अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. लोहा तालुक्यात किवळा येथील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास महिलांची मोठी गर्दी होते. पिण्याचे पाणी मिळावे, या साठी तारुबाई मारोती टोकलवाड (वय २०) व मंजूषा प्रकाश डिकळे (वय ११) या अन्य महिलांप्रमाणे धडपडत होत्या. मात्र, या धडपडीनेच दोघी विहिरीत पडल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुपारी १२ वाजता घडलेल्या या प्रकाराने किवळा गावात शोककळा पसरली. तारूबाई टोकलवाड माहेरी आल्या होत्या, तर मंजूषा किवळा येथेच पाचवीच्या वर्गात शिकत होती. पिण्याचे पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

Story img Loader